ट्रॅव्हल्स व्यावसायिकांकडून “शिवशाही’ची कॉपी

-प्रवाशांकडून मिळता प्रतिसादाचा घेताला धसका
– महामंडळाकडून कारवाईचा इशारा

पुणे –
एसटी महामंडळाची “शिवशाही’ बस भन्नाट फॉर्मात आली आहे, या बसमुळे खासगी बसचालकांचा व्यवसाय खाली आला आहे. त्यामुळे भेदरलेल्या खासगी बसचालकांनी चक्क शिवशाही बसची कॉपी केली आहे. या माध्यमातून शिवशाहीचा प्रवासी पळविता येइल असा खासगी बसचालकांचा कयास आहे. त्याची गंभीर दखल एसटी महामंडळाच्या मुख्य कार्यालयाने घेतली असून अशा व्यवसायिकांच्या विरोधात कारवाई करण्यात येइल, असा इशारा महामंडळाने दिला आहे.

खासगी बसेसच्या स्पर्धेत टिकण्यासाठी एसटी महामंडळाने आपल्या कारभारात आमुलाग्र बदल केला आहे. त्यासाठी आपल्या ताफ्यात शिवनेरी, अश्‍वमेध आणि हिरकणी अशा वातानुकुलित आणि आरामदायी बसेस दाखल केल्या आहेत. त्यामुळे महामंडळाचा व्यवसाय चांगलाच बहरात आला आहे. त्याचाच धसका घेऊन खासगी बसचालकांनी महामंडळाची प्रतिष्ठित असलेली “शिवनेरी’ या बसची हूबेहूब कॉपी केली होती, त्यावेळी त्याची गंभीर दखल घेऊन महामंडळाने अशा व्यवसायिकांच्या विरोधात धडक कारवाई केली होती. आता पुन्हा “शिवशाही’ बसच्या बाबतीतही अशाच पध्दतीने कॉपी झाल्याने महामंडळाची डोकेदुखी वाढली आहे.

परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी 2016 मध्ये प्रवाशांना सवलतीच्या दरात वातानुकुलित आणि आरामदायी प्रवास करता यावा, यासाठी “शिवशाही’ ही बस ताफ्यात आणण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सद्यस्थितीत महामंडळाच्या ताफ्यात आसनी आणि “स्लिपर कोच’ अशा नऊशे बसेस आहेत, या बसेसमुळे खासगी बसेसच्या चालकांच्या व्यवसायाने चांगलाच मार खाल्ला आहे. त्याशिवाय देशभरात विना वातानुकुलित स्लिपर कोचच्या नोंदणीला बंदी असल्याने राज्य शासनाने मोटार वाहन कायद्यात बदल करून विना वातानुकुलित “स्लिपर कोच’ शिवशाही बससेवा सुरू केली आहे.

हे वास्तव असतानाच एसटी महामंडळाच्या वातानुकुलित बसला प्रवाशांची चांगलीच मागणी वाढली आहे. त्यामुळे खासगी बसचालकांचे धाबे दणाणले आहेत. शिवशाहीच्या वाढत्या लोकप्रियतेचा फटका त्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळेच “शिवशाही’ बसेसची रंगसंगती करून खासगी ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून अशा बसेस मार्गावर आणण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होत आहे.

“शिवशाही’ बसेसचे डिझाईन पूर्णत: वेगळे आहे, यापूर्वीही शिवनेरी या बसेसची कॉपी करण्याचा प्रयत्न काही ट्रॅव्हल्स चालकांच्या माध्यमातून झाला होता. त्यांच्यावर यापूर्वी कारवाई करण्यात आली आहे, त्यामुळेच अशा पध्दतीने रंगसंगती करणाऱ्यांचा शोध महामंडळाच्या वतीने सुरु करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधातही कारवाई करण्याचा महामंडळ गांभीर्याने विचार करत आहे.

– दिवाकर रावते, परिवहन मंत्री आणि अध्यक्ष, एसटी महामंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)