बंगलुरू – कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी आज दिल्लीत होणाऱ्या विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीला जाणार होते पण त्यांचा दिल्ली दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे त्यामुळे अनेक तर्क लढवले जात आहेत. त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली मात्र त्याचे कारण त्यांनी दिलेले नाही.
त्यांच्या पुर्वनियोजित कार्यक्रमानुसार कुमारस्वामी हे विशेष विमानाने आज दुपारी 11 वाजता दिल्लीला जाणार होते व सायंकाळी बैठक आटोपून ते परत येणार होते. इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्रांची सुरक्षा आणि व्हीव्हीपॅट मशिन मध्ये नोंदवले गेलेले मतदान याविषयी विरोधी पक्षांच्या नेत्यांची एक महत्वाची बैठक आज दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. एक्झिट पोल निकालाच्या निष्कर्षानंतर विरोधकांनी या विषयी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे.
स्वता कुमारस्वामी यांनी एक्झिट पोल चाचण्यांच्या निष्कर्षावर जोरदार आक्षेप घेतला आहे. सध्या कर्नाटकात जेडीएस आणि कॉंग्रेस यांच्यातील संबंध ताणले गेले असल्याने कुमारस्वामी यांच्या अचानक रद्द करण्यात आलेल्या दौऱ्याविषयी राजधानी बंगुलुरू येथे उलटसुलट प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत.