कंत्राटींच्या जीवावर “कॅन्टोन्मेंट’चा कारभार

मनुष्यबळाची चणचण : नोकरभरतीही रखडली
पुणे – कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य, महसूल, बांधकाम, अभियांत्रिकी, भांडार अशा अनेक विभागांमध्ये सर्व श्रेणीतील 1,100 पदे आहेत. या पदांवर कार्यरत बहुतांश कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे शेकडो पदे रिक्त झाली आहेत. मात्र बोर्डातर्फे नोकरभरतीची प्रक्रिया रखडल्याने बहुतांश विभागात मनुष्यबळाची चणचण भासत आहे. परिणाम बोर्डातर्फे दिल्या जाणाऱ्या नागरी सुविधांवर मोठा परिणाम होत आहे.

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या विविध विभागांतील पदे रिक्‍त आहेत. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून बोर्डाचा कारभार चालविला जात आहे. मात्र, बोर्डाच्या कामांचा विस्तार वेगाने वाढत असल्याने कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. बोर्डाच्या उद्यान, आरोग्य यांसारख्या महत्त्वाच्या विभागात अवघे बोटावर मोजण्याइतके कायमस्वरुपी कर्मचारी उरले आहेत. त्यामुळे मनुष्यबळ वाढविण्याची मागणी केली जात आहे. त्या पार्श्‍वभूमीवर बोर्डाने वर्षभरापूर्वी विविध विभागांतील 77 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मागील वर्षी मार्चमध्ये ऑनलाइन अर्ज मागविले होते. त्यावर या रिक्त पदांसाठी देशभरातून तब्बल 1 लाख 35 हजार अर्ज आले होते.

या अर्जांची छाननी झाल्यावर कॅन्टोन्मेंट कायद्याच्या मार्गदर्शक नियमावलीप्रमाणे परीक्षा घेण्याचे नियोजनही बोर्ड प्रशासनाने केले होते. मात्र, काहींनी परीक्षा पद्धतीवर आक्षेप घेतल्याने ही भरती प्रक्रिया थांबविण्यात आली. त्यानंतर वर्षभराचा कालावधी उलटल्यावरही नोकरभरती प्रक्रियेला मुहूर्त सापडलेला नाही. त्याचा फटका कॅन्टोन्मेंटमधील नागरी सेवांना बसत असून कचरा संकलन व व्यवस्थापन, स्वच्छता राखणे, सार्वजनिक स्वच्छतागृहांचे व्यवस्थापन, भटक्‍या व मोकाट जनावरांवर नियंत्रण, नालेसफाई अशी विविध कामांचा बोजवारा उडाला आहे. दरम्यान, या प्रक्रियेसाठी पॅनेल मिळत नसल्याने विलंब होत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)