आश्रमशाळांमध्ये यापुढे कंत्राटी कला शिक्षक

पुणे – राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांमध्ये प्रत्येकी एक कला (कार्यानुभव) शिक्षक कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार असून त्यास शासनाकडून मंजुरीही देण्यात आली आहे. “आरटीई’ 2009 च्या कायद्यानुसार कला, शारीरिक शिक्षण, आरोग्य, कार्यानुभव या विषयांसाठी कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरुपात मानधनावर शिक्षक नियुक्तीची तरतूद आहे.

शिक्षणतज्ज्ञ यशपाल यांच्या समितीने राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात कला विषयाला शालेय स्तरावर शिक्षणाचा पाया म्हणून महत्व दिलेले आहे. विद्यार्थ्यांना कमी वयात शारीरिक महत्व कळावे, कलागुणांना वाव मिळावा, कल्पकता निर्माण करणे व वृद्धिंगत करण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात कला व क्रीडा विषयाची महत्वपूर्ण भूमिका असते, त्यामुळे आश्रमशाळांमध्ये कला शिक्षकांची गरज निर्माण झाली आहे. मात्र, या शाळांमध्ये कला शिक्षकांचे पद मंजूर नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. ही पदे मंजूर होईपर्यंत कंत्राटी पद्धतीने शिक्षक नेमण्याचा तोडगा काढण्यात आला आहे.

कला शिक्षकाला प्रति महिना 20 हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. 11 महिन्यासाठीच या शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या शिक्षकांकडे आर्ट टीचर डिप्लोमा (ए.टी.डी) ही किमान शैक्षणिक अर्हता असणे आवश्‍यक आहे. उच्च शिक्षित ए.एम. किंवा बी.एफ.ए. व नृत्य, गायन, वादन विषयातील पदवी अहर्ता प्राप्त उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. उमेदवारांसाठी किमान वयोमर्यादा 18 वर्ष व कमाल वयोमर्यादा 43 वर्ष निश्‍चित करण्यात आली आहे. या शिक्षकांच्या निवडीसाठी चार सदस्यांची समिती गठीत करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर जाहिरात प्रसिद्ध करुन अर्ज भरतीसाठी मागवावेत. मुलींच्या आश्रमशाळेत महिला शिक्षिकेला प्राधान्य देण्यात यावे. जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे. पारदर्शक पद्धतीने या शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)