पालिकेच्या दहा शाळा डिजिटल करण्याच्या हालचाली सुरू

सातारा –  सातारा शहरातील पालिकेच्या दहा शाळा डिजिटल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रोजेक्‍टर एलसीडीसह प्रशस्त बेंचेस आणण्याच्या कामात नगराध्यक्ष माधवी कदम यांनी पुढाकार घेतला असून शिक्षण मंडळात या प्रोजेक्‍टची आखणी सुरू झाली आहे.

येथील सात शाळा व चारही अंगणवाड्या डीजिटल झाल्या आहेत. संपूर्ण ई लर्निंग सुविधा असलेल्या या डिजिटल शाळांमुळे पटसंख्या वाढण्यास मदत होणार आहे असा विश्‍वास प्रभारी प्रशासन प्रमुख मारूती भांगे यांनी व्यक्त केला. हा जिल्ह्यातील अ वर्ग नगरपालिका क्षेत्रात पहिला आणि एकमेव प्रयोग ठरला आहे. त्यामुळे एकूण 200 पटसंख्या असलेल्या या चिमुकल्यांना शैक्षणिक आयुष्याच्या सुरुवातीपासूनच संगणकीकरणाचे धडे गिरवता येणार आहेत. त्यासाठी पालिकेकडून 14 व्या वित्त आयोगातून एकूण पंचवीस लाखांची तरतूद केली. अंगणवाड्याना व शाळांना एल. जी. कंपनीचे अत्याधुनिक 43 इंची डिजिटल टीव्ही पुरविले जाणार आहेत.

अंगणवाड्याच्या आणि शाळांच्या सुशोभीकरणासाठी साताऱ्यातूनही काही दानशूर हात पुढे आले आहेत. मात्र उपनगराध्यक्ष हा शिक्षण मंडळाचा पदसिद्ध सभापती असतो. ही जबाबदारी 21 जूनपासून किशोर शिंदे यांच्या खांद्यावर येणार आहे. त्यामुळे उपनगराध्यक्ष निवड व डिजिटल शाळांना प्रारंभ या गोष्टी समांतरपणे राबवाव्या लागणार आहेत. निधी जमा होत आहे. आतापर्यंत दोन लाखांहून अधिक निधी गावकऱ्यांच्या सहभागातून उभा राहिला आहे.

या सर्वच अंगणवाड्यांच्या अंतर्गत सजावट व गुणवत्तावाढीसह सौंदर्यीकरणासाठी ग्रामस्थही ऊत्स्फूर्तपणे पुढे येत आहेत.
यावेळी बोलताना नगराध्यक्षा माधवी कदम म्हणल्या, माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात अंगणवाड्या अजूनही अव्वल बनविण्यासाठी अद्ययावत व सुसज्ज संगणक प्रयोगशाळेसह अनुषंगिक सर्वच सोयीसुविधा लवकरच निर्माण करू. पालिका शाळांमध्ये चार अंगणवाड्यांमधून एकूण दोनशेहून अधिक विद्यार्थी शिकत आहेत. डीजीटल अंगणवाड्या हा राज्यातील नावाजला गेलेला उपक्रम आहे. या शाळांसाठी नगराध्यक्षांच्या अधिकारात विशेष फंड उभा राहणार आहे. त्यामुळे गावातील विद्यार्थी अंगणवाडीपासूनच माहिती आणि तंत्रज्ञानाच्या महाजालाशी जोडले जाणार आहेत. आधुनिक शिक्षणप्रणालीच्यादृष्टीने हा प्रयोग महत्त्वाकांक्षी ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)