राज्यातील प्रमुख रस्त्यावरील रेल्वे क्रॉसिंगवर 250 उड्डाणपुलांची निर्मिती- मुख्यमंत्री

जळगाव: भुसावळ शहरातील 5 हजार बेघर नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून लवकरच मोफत घरे उपलब्ध करून देणार असून स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षापर्यंत देशात एकही पात्र लाभार्थी बेघर राहू नये, यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

भुसावळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पटांगणावर आयोजित विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 31 कोटी रुपये खर्चाचे सावदा,निंभोरा, बोदवड येथील रेल्वे क्रॉसिंग वरील उड्डाणपुलांचे भूमिपूजन, आयुष्यमान भारत योजनेच्या पाच लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात ओळखपत्रांचे वाटप, 2 कोटी 54 लक्ष रुपये खर्चाच्या भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी  उद्यानाचे लोकार्पण, भुसावळ येथील प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण व आमदार संजय सावकारे यांच्या स्थानिक विकास निधीतून तयार करण्यात आलेल्या उद्यानाचे लोकार्पण अशा विविध विकास कामांचे रिमोटद्वारे उद्घाटन करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, राज्यातील प्रमुख रस्त्यावरील रेल्वे क्रॉसिंगवर 250 उड्डाणपुलांची निर्मिती करण्यात येणार असून त्यातील पहिल्या टप्प्यात भुसावळ शहरासह परिसरातील तीन पुलांचे लोकार्पण व भूमिपूजन आज संपन्न होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळात रेल्वेचे अभूतपूर्व असे काम झाले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मेगा रिचार्ज प्रकल्पामुळे जळगाव जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार आहे. यासाठी 6 हजार कोटी रुपयांचा डीपीआर सादर करण्यात आला असून तो लवकरात लवकर मंजूर होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून देशातील 50 कोटी नागरीकांना 5 लाख रुपयापर्यंतचा उपचार मोफत देण्याचा निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतला. ही जगातील सर्वात मोठी ऐतिहासिक योजना असून या योजनेचा 19 लाख रुग्णांनी आतापर्यत लाभ घेतला आहे. जिल्ह्याच्या सर्वागीण विकासासाठी राहुरी कृषी विद्यापीठाच्या धर्तीवर जळगाव जिल्ह्यात एक कृषी विद्यापीठाबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, तसेच भुसावळ शहरातील राज्य राखीव पोलीस दल प्रशिक्षणाचे अपूर्ण कामाबाबत तातडीने निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील 12 कोटी असंघटित कामगारांसाठी योजना तयार करण्यात आली असून या योजनेच्या माध्यमातून असंघटित कामगारांना दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी 75 हजार कोटी रुपयांची प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना कार्यान्वीत केली आहे. यापुढे देशातील प्रत्येक पात्र शेतक-यांच्या बँक खात्यावर 6 हजार रुपये जमा करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पुलवामा येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान शहीद झाले असून त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब घेतला जाणार असून त्यासाठी प्रधानमंत्र्यांनी सैन्यदलाला आवश्यक त्या सुचना दिल्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)