पुणे – बांधकामांना पूर्णत्वाचा दाखला देऊ नका

संग्रहित छायाचित्र...

पाण्यासाठी पुन्हा न्यायालयात जाण्याचा इशारा : भाजप नगरसेवकाची आयुक्तांकडे मागणी

पुणे – महापालिकेकडून बाणेर-बालेवाडी भागातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे या भागातील सुरू असलेल्या बांधकामांना पूर्णत्वाचा दाखला तसेच भोगवटापत्रही देऊ नये, अशी धक्कादायक मागणी भाजपचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे.

-Ads-

महापालिका हद्दीत 1997 मध्ये बाणेर आणि बालेवाडी दोन्ही गावे समाविष्ट करण्यात आली. मात्र, गेल्या काही वर्षांत या भागात नागरिकरण वाढल्याने या भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्याविरोधात नगरसेवक होण्यापूर्वी 2015 मध्ये बालवडकर यांनी महापालिकेविरोधात याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने जवळपास 7 ते 8 महिने या भागातील बांधकामांना स्थगिती दिली होती. त्यादरम्यान, महापालिकेत सत्तांतर होऊन बालवडकर हे भाजपमधून निवडून आले. त्याच वेळी बांधकामे बंद असल्याने महापालिकेचीही अडचण झाली होती. त्यामुळे तत्कालीन आयुक्तांसह, पक्षातील पदाधिकारी नेत्यांकडून बालवडकर यांना विनंती करण्यात आली. त्यानंतर पाणी पुरवठाही सुरळीत झाल्याने बालवडकर यांनी आपली याचिका मागे घेतली. मात्र, त्यानंतर आता सहा महिन्यांपासून पाणी पुरवठा पुन्हा विस्कळीत झाल्याने नागरिकांमध्ये मोठया प्रमाणात नाराजी आहे. त्यामुळे आपण पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास पुन्हा न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीसाठी निवड झालेल्या या भागातील बांधकाम व्यावसायिकांच्या अडचणीत भर पडणार असून सत्ताधारी भाजपचीही कोंडी होणार आहे.

पुन्हा बांधकाम व्यावसायिकच वेठीस
बाणेर-बालेवाडीत महापालिकेकडून पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे बांधकाम परवाने, वाढते नागरिकरण याचा विचार करून पाणीपुरवठा आवश्‍यक आहे. त्यातच, या भागाची निवड स्मार्ट सिटीमध्ये झाल्याने मंदीच्या गर्तेत असलेल्या बांधकाम क्षेत्राला या भागात तुलनेने चांगला प्रतिसाद आहे. मात्र, पाण्याच्या या गैरसोयीमुळे बांधकाम व्यावसायिकच अडचणीत आल्याचे चित्र आहे. यापूर्वीही सात ते आठ महिने बांधकामे बंद असल्याने अनेक व्यावसायिकांना त्याचा लाखो रुपयांचा फटका बसला आहे. आता पुन्हा पाण्याची समस्या निर्माण झाल्याने बांधकामांना पूर्णत्वाचा दाखला देऊ नये, भोगवटा पत्र देऊ नये अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे पालिकेच्या गोंधळाची शिक्षा बांधकाम व्यावसायिकांना का? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)