नगरमध्ये मतदारसंघाची अदलाबदली? ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्षा

मुंबईत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबते 

प्रदीप पेंढारे/नगर: लोकसभा निवडणुकीसाठी फक्त “विन’ हाच निकष ठेवल्याने भारतीय जनता पक्षाने राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघाची बारकाईने छाननी सुरू आहे. भाजप-शिवसेना युती झाल्याने, दोन्ही पक्षांनी या छाननीचे स्वरूप अधिकच “मायक्रो’ केले आहे. यात काही मतदारसंघांची अदलाबदलीची चर्चा होत आहे. नगर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांचा यासाठी विचार होत आहे. भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रभारी तथा खासदार सरोज पांडे यांनी यासाठी आग्रही भूमिका घेतल्याचे राजकीय सूत्रांकडून खात्रीशीर समजते आहे.

नगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघ, पूर्वीचा कोपरगाव मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला होता. भारतीय जनता पक्षाकडून दिवंगत नेते भीमराव बडदे यांनी कॉंग्रेसचे दिवंगत नेते शंकरराव काळे यांना येथे पराभूत केले होते. दिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटील यांचे या मतदारसंघावर वर्चस्व राहिले आहे. लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेत शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा राखीव झाला. युतीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला. या मतदारसंघावर नेहमीच शिवसेनेचे वर्चस्व राहिल्याचे दिसते. भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेनेकडून आघाडीचे उमेदवार रामदास आठवले यांना पराभूत केले होते. गेल्या पंचवार्षिकला भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. त्यांनी कॉंग्रेसकडून निवडणूक लढवली. शिवसेनेकडून सदाशिव लोखंडे यांनी वाकचौरे यांचा पराभव केला.

खासदार लोखंडे यांचा राजकीय इतिहास पाहता, ते कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून तीन वेळा आमदार झाले आहेत. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांचे ते निकटवर्तीय आहेत. सध्या त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगलीच जवळीक आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून लोखंडे यांची केंद्रीय पातळीवरील भाजप नेत्यांबरोबर उठबस वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिर्डी दौऱ्यावर होते. खासदार लोखंडे हेच ते निमंत्रण घेऊन गेले होते. जिल्ह्यात नुकत्याच होऊन गेलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कल पाहता त्यात भारतीय जनता पक्षाने शिर्डी लोकसभा मतदारसंघात चांगलीच बाजी मारली आहे. जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी पक्ष विस्तारासाठी बूथरचनेची व विविध बैठकांचे नियोजन शिर्डी येथे केले होते. या नियोजनाची केंद्र व राज्य पातळीवर देखील दखल घेतली गेली आहे. त्यामुळे खासदार लोखंडे यांचा शिर्डी मतदार संघातून 2019 ची लोकसभा निवडणूक शिवसेनेपेक्षा भाजपकडून लढविण्याची चाचपणी करत आहेत. तशी मतदारसंघात वातावरण निर्मिती देखील केली जात आहे.

नगर दक्षिण मतदारसंघावर खासदार दिलीप गांधी यांच्या रूपाने भाजपचे वर्चस्व आहे. परंतु खासदार गांधी यांना दिवसागणित विरोध वाढत आहे. युती होऊन देखील शिवसेनेकडून खासदार गांधी यांना उघड विरोध सुरू झाला आहे. भाजपचे नगर महापालिका निवडणुकीतील पराभव हे सर्वात मोठे उदाहरण देत खासदार गांधी यांना विरोध वाढतो आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांनी दक्षिणमध्ये तळ ठोकला आहे. कोणत्याही परिस्थिती निवडणूक लढविण्याची अशी त्यांची तयारी केली आहे.

विखे पाटील घराण्याचा राजकीय इतिहास पाहिल्यास राजकीय पुनर्वसनासाठी शिवसेनाच मदतीला धावली आहे. दिवंगत बाळासाहेब विखे पाटील हे शिवसेनेकडून केंद्रात जाऊन मंत्रिपद उपभोगले होते. राज्यात आता राधाकृष्ण विखे पाटील यांना विधानसभेचे विरोधीपक्ष नेतेपद शिवसेनेकडूनच हस्तांतरीत झाल्याचे सांगितले जाते. राष्ट्रवादीकडून प्रशांत गडाख किंवा नरेंद्र घुले पाटील यांची नावे पुढे आहेत. त्यामुळे डॉ. विखे पाटील हे पक्ष उमेदवारीच्या अजूनही शोधात आहे. त्यात भाजप-शिवसेना युतीने नगर जिल्ह्यातील लोकसभा मतदार संघ अदलाबदली केल्यास अनेक राजकीय उलथापालथ होण्याची शक्‍यता आहे. नगर दक्षिण मतदारसंघाचा राजकीय अभ्यासानुसार शिवसेनेची ताकद ही भाजपपेक्षा वरचढच असल्याचे दिसते. त्यामुळे शिवसेनेलाही ही जागा लढविणे सोयीस्कर ठरणारी आहे.

सत्तेच्या दृष्टिने भारतीय जनता पक्षाला प्रत्येक जागा महत्त्वाची असल्याने मुंबईत नगरचा दक्षिण मतदारसंघातील उमेदवाराविषयी खलबते सुरू आहेत. त्यात नगर जिल्ह्यातील शिर्डी-नगर दक्षिण मतदारसंघ अदलाबदली करण्याची शक्‍यता आहे. भाजपच्या महाराष्ट्रच्या प्रभारी तथा खासदार सरोज पांडे यांनी यासंदर्भात भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्यासमोर या भूमिकेचे समर्थन केल्याचेही माहिती सूत्रांनी सांगितली. या पक्ष नेत्यांनी देखील याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची तयारी दर्शविल्याचे खात्रीलायक समजते.

तारीख 24 आणि 25 ठरणार निर्णायक

जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे रविवारी (दि. 24) निळवंडे (ता. अकोले) येथे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर राज्यातील लोकसभा निवडणुकीची जबाबदारी आहे. महाजन हे फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. महाजन यांचा हा दौरा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आहे. या दौऱ्यात शिर्डी मतदारसंघाविषयी महाजन हे मुख्यमंत्री फडवणीस यांना कोणता निरोप देतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांना सोमवारी (दि. 25) स्नेहभोजन ठेवले आहे. यानिमित्ताने लोकसभा निवडणुकीची बरेच खलबते होणार आहेत. त्यात नगर जिल्ह्यातील मतदारसंघाच्या अदलाबदलीचा विषय देखील होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)