काँग्रेसला अभूतपूर्व यश, इंदिरा गांधींचे पुनरागमन

लोकसभा निवडणूक : 1980

– विनायक सरदेसाई 

मोरारजी देसाईंच्या नेतृज्वाखाली बनलेल्या जनता पक्षाच्या बिगर कॉंग्रेसी सरकारकडून जनतेला प्रचंड अपेक्षा होत्या. पण जनता पक्ष अंतर्कलहाने इतका ग्रासला की विकासाचे राजकारण तर दूरच पण देशातील जनतेपुढील महत्त्वाच्या, कळीच्या प्रश्‍नांचेही त्यांना सोयरसुतक उरले नाही. वेगवेगळ्या विचारधारा असणाऱ्या पक्षांना एकत्र घेऊन बनलेल्या या सरकारमध्ये अवघ्या दोन वर्षांतच छोट्या छोट्या मुद्द्यांवरून अंतर्गत संघर्ष निर्माण झाला. एकीकडे मोरारजी देसाईंचा पक्ष कॉंग्रेस होता, तर दुसरीकडे अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखालील जनसंघ आणि चरण सिंहांच्या नेतृत्त्वाखालील लोकदल यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला. जनसंघातील सदस्यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेल्या संबंधांना होणारा विरोध तीव्र होऊ लागला. प्रत्येक जण आपापल्या भूमिकेवर अडून राहू लागला.

सरकारला दोन वर्षे पूर्ण होता होता चाललेल्या या अंतर्गत द्वंद्वामुळे हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ कसा पूर्ण करणार असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला. अखेरीस लोकदल आणि सोशालिस्ट पार्टी यांनी मोरारजी देसाई सरकारचा पाठिंबा काढून घेतला. यानंतर सरकारला लोकसभेत विश्‍वासदर्शक ठराव जिंकण्यात अपयश आले आणि 28 जुलै 1979 रोजी मोरारजी देसाई यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. कॉंग्रेसने जनता पार्टी (सेक्‍युलर) चे नेते चरणसिंग यांना पाठिंबा देऊन पंतप्रधान बनवले आणि सत्तेच्या खुर्चीवर उडी घेतली. मात्र काही महिन्यांनी कॉंग्रेसने चरणसिंगांचा पाठिंबा काढून घेतला आणि ते सरकार कोसळले. परिणामी मध्यावधी निवडणुकांची नामुष्की देशावर ओढावली.

1980 च्या जानेवारी महिन्यात सातव्या लोकसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये एकीकडे कॉंग्रेस होती तर दुसरीकडे शकले झालेली जनता पार्टी होती. यातील एका जनता पार्टीचे नेतृत्त्व चंद्रशेखरांकडे होते, तर जनता पार्टी सेक्‍युलरचे नेतृत्त्व चरणसिंगांकडे होते. या निवडणुकांमध्ये जनतेने प्रचंड बहुमताने कॉंग्रेसला सत्तेच्या सिंहासनावर बसवले. इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस (आय) पक्षाला विक्रमी अशा 353 जागा मिळाल्या. बिगर कॉंग्रेसवादाचा प्रयोग अडीच वर्षांतच पूर्णपणे फसला होता. चरणसिंहांच्या नेतृत्त्वाखालील पक्षाने या निवडणुकीत अवघ्या 41 जागांवर, तर चंद्रशेखरांच्या पक्षाने 31 जागांवर विजय मिळवला. माकपाने या निवडणुकीत 37 जागा जिंकत आपल्या ताकदीचे दर्शन घडवले. तामिळनाडूत द्रमुक पक्षाने 16 जागांवर विजय मिळवला. 1980 च्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेस पुन्हा एकदा आपल्या गडावर स्वार झाला. कर्नाटकातील तत्कालीन मुख्यमंत्री डी. देवराज अर्स यांच्या अध्यक्षतेखालील कॉंग्रेस (अर्स) या पक्षाने 13 जागांवर विजय मिळवला. 14 जानेवारी 1980 रोजी इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली.

मध्य प्रदेशात सुफडासाफ
तीन वर्षांपूर्वी म्हणजेच 1977 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये राजस्थान आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांत केवळ दोन जागा जिंकणाऱ्या कॉंग्रेसने 1980 च्या निवडणुकांत 65 जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व पुन्हा प्रस्थापित केले. मध्य प्रदेशात कॉंग्रेसने 35 आणि राजस्थानात 19 जागांवर विजय मिळवला. 1977च्या निवडणुकीत ज्या जनता पक्षाने या दोन्ही राज्यात तुफानी विजय मिळवला होता त्या पक्षाला या दोनही राज्यात प्रचंड पिछाडीवर जावे लागले. जनता पक्षाला राजस्थान आणि मध्य प्रदेशात केवळ 10 जागांवर समाधान मानावे लागेल.

पराभवाचा वचपा काढला
1977 च्या जनता लाटेमध्ये रायबरेली या होमग्राऊंड मतदारसंघात मानहानीकारक पराभव पत्करावा लागलेल्या इंदिरा गांधींनी 1980 च्या निवणुकीत प्रचंड बहुमताने विजय मिळवला. त्यांनी जनता पक्षाचे उमेदवार विजयाराजे सिंधिया यांना पावणे दोन लाख मतांनी पराभूत केले. अमेठी लोकसभा मतदारसंघातून इंदिरा गांधींचे सुपुत्र संजय गांधी यांनीही जनता पक्षाचे उमेदवार रविंद्र प्रताप शाही यांच्यावर विजय मिळवत आपल्या मागील पराभवाचा वचपा काढला. 1977 मध्ये शाही यांच्याकडून पराभूत झालेल्या संजय गांधी यांनी 1980 च्या या निवडणुकीत सव्वा लाखांच्या मताधिक्‍याने शाहींचा पराभव केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)