पुदुचेरीत काँग्रेसचाच दबदबा

पुदुचेरीचे नाव 2006 मध्ये बदलून पुडुचेरी असे करण्यात आले. 9,01,357 लोकसंख्या असणाऱ्या या राज्यात लोकसभेची केवळ एकच जागा आहे. 1967 मध्ये तेथे पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणुका झाल्या. या पहिल्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या थिरुमडी सेतुरमण यांनी विजय मिळवत पुडुचेरीचे पहिले खासदार होण्याचा मान मिळवला.

1971 मध्ये या जागेवरुन कॉंग्रेसच्याच मोहन कुमारमंगलम यांनी विजय मिळवला. 1977 च्या निवडणुकांमध्ये मात्र बाजी पलटली आणि या राज्यातून पहिल्यांदाच बिगर कॉंग्रेसी उमेदवार विजयी झाला. एआयडीएमकेचे अरविंद बाला पाजानोर यांनी ही जागा पटकावली. पुढे 1980, 1984 आणि 1989 मध्ये पी. शानमुगम हे विजयी झाले. 1980 पासून 1998 पर्यंत या जागेवर कॉंग्रेसचा दबदबा राहिला. 1998 मध्ये पहिल्यांदा द्रमुकचे के. एस. अरुमुघम यांचा या राज्यातून विजय झाला. 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये या जागेवरुन एआयएनआरसीचे आर राधाकृष्ण यांनी कॉंग्रेसच्या के. व्ही. नारायण सामी यांना पराभूत करून विजय मिळवला होता. या निवडणुकीत राधाकृष्णन यांना 2,55,826 (34.57 टक्‍के) मते मिळाली होती, तर कॉंग्रेसच्या नारायणसामी यांना 1,94,972 (26.35 टक्‍के) मते मिळाली होती. 2009 च्या लोकसभा निवडणुकांत नारायणसामी यांना 300391 म्हणजेच 49.41 टक्‍के मते मिळाली होती.

2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये या राज्यातील 7,40,017 मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला होता. जवळपास 82 टक्‍के इतके मतदान झाले होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदारांची संख्या वाढली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून इथे लोकसभेच्या राजकारणाचे वातावरण तापू लागले आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकांनंतर केंद्रातील मोदी सरकारने या राज्याच्या राज्यपालपदी माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांची नियुक्‍ती केली. मध्यंतरी त्यांच्याविरोधात पुडुचेरीचे मुख्यमंत्री नारायणसामी यांनी धरणे आंदोलन केले होते. त्याला पाठिंबा देण्यासाठी थेट केजरीवालांनी हजेरी लावली होती. अलीकडेच तेथे वैलिंगम यांनी आपल्या विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून ते कॉंग्रेसतर्फे लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. वैथीलिंगम हे 1991 ते 1996 आणि 2008 ते 2011 या काळात पुडुचेरीचे मुख्यमंत्री राहिले आहेत. 1985 ते 2016 या काळात तब्बल 8 वेळा त्यांनी विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या आहेत. नेटापक्‍कम विधानसभा मतदारसंघातून ते सलग सहा वेळा विजयी झाले आहेत. त्यांच्याविरोधात अण्णाद्रमुकचा उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्‍यता आहे. 18 एप्रिल रोजी या राज्यात लोकसभेसाठीचे मतदान पार पडणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)