बिलासपूर, (मध्यप्रदेश) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कॉंग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी आणि माजी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर कडाडून टीका केली. कॉंग्रेस पक्षाचे राजकारण एका कुटुंबातूनच सुरू होते आणि एका कुटुंबातच संपते. कॉंग्रेस पक्षाचे राजकारण एकाच कुटुंबापुरते मर्यादित आहे, असे ते म्हणाले.
मध्यप्रदेशातील विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यासाठीच्या प्रचारसभेमध्ये पंतप्रधान बोलत होते. विकासाच्या मुद्दयावरही मोदी यांनी विशेष भर दिला. मध्यप्रदेशात कॉंग्रेसचे सरकार असताना विकासाचा वेग अतिशय मंद होता. त्या तुलनेत भाजपच्या सरकारच्या काळात वेगाने विकास झाला असल्याचा दावा पंतप्रधानांनी केला.
सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे दोघेही जामिनावर बाहेर आहेत, अशा शब्दात मोदी यांनी त्यांच्यावर टीका केली. सरकारने केलेल्या नोटबंदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याबद्दलही पंतप्रधानांनी त्यांच्यावर टीका केली.
नोटबंदीमुळेच या मायलेकांना जामीन मिळवावा लागला,हे ते विसरत आहेत. जामीन मागणारेच आज प्रमाणपत्र देत आहेत, अशी टीका मोदी यांनी केली. कॉंग्रेसचे छत्तीसगडमधील जाहिरनाम्यामध्ये राहुल गांधी यांचा “सर’ असा उल्लेख 150 वेळा आला आहे. त्यातूनच कॉंग्रेस पक्षात राहुल गांधी यांना छत्तीसगडपेक्षा अधिक महत्व दिले जात असल्याचे स्पष्ट होत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा