पक्षातर्फे सत्यशील शेरकर यांना कार्यकर्त्यांचा एकमुखी पाठिंबा
निवृत्तीनगर – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुन्नर तालुका कॉंग्रेस आय पक्ष कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी (दि. 2) सत्यशील शेरकर यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीत जुन्नर तालुका कॉंग्रेस आय पक्षातर्फे प्रदेश प्रतिनिधी तथा विघ्नहरचे चेअरमन सत्यशील शेरकर यांच्या नावाचा एकमेव अर्ज दाखल करण्याचा प्रस्ताव बाजार समितीचे संचालक रंगनाथ घोलप यांनी मांडला. ह्या प्रस्तावाला तालुका अध्यक्ष अशोक घोलप व उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमुखी पाठिंबा दिला.
राज्यात आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या सूचनेनुसार राज्यातील प्रत्येक तालुक्यातून इच्छुक असणाऱ्या उमेदवारांचे अर्ज 6 जुलै 2019 पर्यंत मागविण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. वरिष्ठ पातळीवरील आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत ठरल्यानुसार पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर, पुरंदर, भोर तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघातील जुन्नरची जागा कॉंग्रेस पक्षाला सोडण्याचा निर्णय झाला आहे. त्या दृष्टीने निवडणूक तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आलेले आहे.
मारुती वायाळ म्हणाले, जुन्नर विधानसभेची जागा कॉंग्रेस पक्षाला सोडली असून सत्यशील शेरकर यांनाच उमेदवारी देण्यात यावी व त्यादृष्टीने सर्व कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे. मंगलदास सोलाट म्हणाले, तालुक्यात सत्यशील शेरकर यांचा असलेला दांडगा जनसंपर्क, शेतकऱ्यांविषयी संघर्ष करून त्यांचे प्रश्न सोडविण्याची असलेली तयारी, युवक वर्गाचा असलेला पाठिंबा तसेच समाजातील विविध घटकांना बरोबर घेऊन काम करण्याची असलेली भूमिका यामुळे शेरकर यांच्या नावाचा एकमेव अर्ज प्रदेश अध्यक्षांकडे पाठविण्यात येणार आहे.
ह्यावेळी प्रदेश प्रतिनिधी सत्यशील शेरकर, तालुकाध्यक्ष अशोक घोलप, उपाध्यक्ष मारुती वायाळ, राहुल फुलसुंदर, बाजार समिती संचालक रंगनाथ घोलप, उपसभापती उदय भोपे, शांताताई कुटे, जिल्हा युवती अध्यक्ष प्रिती शिंगोटे, काळू शेळकंदे, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत कदम, सुनील ढवळे, श्रीहरी शिंदे, कुंडलिक गायकवाड, विष्णू शेरकर, सुभाष गावडे, देवेंद्र खिलारी, प्रदीप थोरवे, सचिन हाडवळे, युवक उपाध्यक्ष राहुल जाधव, भानुदास पानसरे, आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सुभाष गावडे, हाजराताई इनामदार, अर्चना भुजबळ. दत्ता गाडगे आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सत्यशील शेरकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या जुन्नर तालुक्यातील सर्वच निवडणुकांमध्ये कॉंग्रेस पक्षाची ताकद वाढली आहे. जुन्नर कॉंग्रेस आय पक्षातर्फे सत्यशील शेरकर यांचा एकमेव अर्ज पाठविण्यात येईल. प्रदेश पातळीवरील सूचनेनुसार जुन्नरची जागा कॉंग्रेस पक्षाला सोडण्यात येणार असून त्यादृष्टीने सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.
– अशोक घोलप, तालुका अध्यक्ष, कॉंग्रेस