राहुल यांचे मन वळवण्यासाठी कॉंग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न

पक्षाध्यक्षपदी कायम राहण्याचा आग्रह

नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयावर ठाम असलेल्या राहुल गांधी यांचे मन वळवण्यासाठी सोमवारी पक्षाचे मुख्यमंत्री पुढे सरसावले. त्यांनी राहुल यांची भेट घेऊन पक्षाध्यक्षपदी कायम राहण्याचा आग्रह धरला.

अशोक गेहलोत (राजस्थान), अमरिंदर सिंग (पंजाब), कमलनाथ (मध्यप्रदेश), भूपेश बघेल (छत्तिसगढ) आणि व्ही.नारायणसामी (पुद्दुचेरी) या कॉंग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी देशाच्या राजधानीत दाखल होऊन राहुल यांचे निवासस्थान गाठले. राहुल यांच्याशी झालेल्या भेटीची माहिती गेहलोत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. आमच्यात सुमारे दोन तास चर्चा झाली. देशभरातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांची भावना आम्ही राहुल यांच्यापर्यंत पोहचवली. पक्षाची धुरा तुम्हीच सांभाळावी, असे साकडे आम्ही त्यांना घातले. आमच्या विनंतीवर ते सकारात्मक विचार करतील अशी आशा वाटते. लोकसभा निवडणुकीतील पीछेहाटीची कारणमीमांसा चर्चेत करण्यात आली. पीछेहाटीची नैतिक जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी स्वीकारली, असे ते म्हणाले.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर 25 मे यादिवशी कॉंग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. त्या बैठकीतच पक्षाच्या सर्व मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव दिला होता. त्यामुळे तो मुद्दा आता निकाली निघाल्याचे गेहलोत यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नाच्या उत्तरादाखल म्हटले. राहुल यांनी कॉंग्रेसला योग्य नेतृत्व दिले आहे. त्यांनी निवडणुकीत भाजपचा थेट मुकाबला केला.

सध्याच्या स्थितीत पक्षाला आवश्‍यक असणारे नेतृत्व तेच देऊ शकतात, अशी पुस्तीही गेहलोत यांनी जोडली. निवडणुकीत भाजपने सामान्य माणसाशी निगडीत मुद्‌द्‌यांवर आधारित राजकारण टाळले. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभक्ती आणि सशस्त्र दलांच्या आड दडून जनतेची दिशाभूल केली. त्या पक्षाने निवडणुकीचे रूपांतर धार्मिक मुद्‌द्‌यामध्ये केले, असा आरोप गेहलोत यांनी केला.

दरम्यान, कॉंग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळण्याची शक्‍यता कमी असल्याचेच संकेत मिळत आहेत. मी माझा निर्णय पक्षाच्या कार्यकारिणीला आधीच कळवला आहे. तो निर्णय बदलणार नाही, असे राहुल यांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सांगितल्याचे समजते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here