आरोग्याच्या हमीचाही कॉंग्रेस विचार करणार – राहुल गांधी

रायपुर: कॉंग्रेस सरकारने गेल्या सरकारच्या कालावधीत माहितीचा आधिकार, शिक्षणाचा अधिकार आणि अन्न सुरक्षेचा अधिकार नागरीकांना प्रदान केला आता त्याच आधारावर आरोग्य उपचार विषयक अधिकारही लागू करण्याचा प्रस्ताव आमच्या विचाराधिन असून पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यातच त्याचे अभिवचन दिले जाऊ शकते असे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

त्यांनी मोदींच्या आयुष्यमान भारत या योजनेवर टीका केली ते म्हणाले की या योजनेचा लाभ देशातील बहुसंख्य लोकांना मिळत नाही आणि केवळ 15 ते 20 व्यावसायिकांच्या हितासाठीच त्यांनी ही योजना सुरू केली आहे. येथील एका स्वयंसेवी संस्थेने सर्वांसाठी आरोग्य या विषयावर दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित केली होती. त्याच्या समारोप प्रसंगी ते वैद्यकीय व्यावसायिकांशी बोलत होते. ते म्हणाले की देशातील नागरीकांच्या औषधोपचाराच्या संबंधात आम्ही तीन प्रमुख गोष्टींवर विचार करीत आहोत. आरोग्य हमी योजनेत काही मुलभूत वैद्यकीय उपचारांचे अधिकार नागरीकांना आम्ही प्रदान करण्याच्या विचारात आहोत. आरोग्यावरील खर्चात वाढ करून तो एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या तीन टक्के इतका असेल असा आमचा प्रयत्न असेल असे ते म्हणाले.

सरकारी वैद्यकीय सेवे मध्ये डॉक्‍टर्स आणि अन्य वैद्यकीय सहायक यांची संख्या वाढवण्याचा आमचा विचार आहे तसेच शिक्षण आणि आरोग्य यावरील खर्चात मोठी वाढ करण्याचाही आमचा मनोदय आहे असे ते म्हणाले. ते म्हणाले की आज ग्रामीण भागाचे मोठ्या प्रमाणात शहरीकरण होत असून हा बदल त्रासदायक आहे. या स्थितीत नागरीकांचे संरक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे असे ते म्हणाले. सर्वात प्रथम रोजगार, नंतर कमी खर्चात अधिक दर्जेदार शिक्षण आणि चांगली आरोग्य सेवा या क्रमाचे प्राधान्य आपले सरकार देईल असेही त्यांनी नमूद केले. आयुष्यमान भारत सारखी मर्यादित लाभ देणारी योजना आम्ही राबवणार नाही. अशा योजनांची अंमलबजावणी केवळ 15 ते 20 व्यावसायिकांचे हित लक्षात ठेऊनच केली गेली आहे असा आरोपही त्यांनी केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)