कर्नाटकपाठोपाठ गोव्यात वाढले कॉंग्रेसचे टेन्शन 

15 पैकी 10 आमदारांचा गट भाजपमध्ये विलीन

पणजी – कर्नाटकमधील राजकीय अस्थिरतेपाठोपाठ शेजारच्या गोव्यातही कॉंग्रेसचे टेन्शन वाढवणारी घटना बुधवारी घडली. कॉंग्रेसच्या 15 पैकी 10 म्हणजेच दोन-तृतीयांश आमदारांचा गट गोव्यातील सत्तारूढ भाजपमध्ये विलीन झाला.

कर्नाटकमध्ये कॉंग्रेस पक्ष जेडीएसशी आघाडी करून सत्तेवर आहे. मात्र, दोन्ही पक्षांच्या काही आमदारांनी बंडाचे निशाण फडकावल्याने तेथील सरकार अडचणीत आले आहे. त्या राज्यातील बंडखोर आमदारांमध्ये बहुसंख्य कॉंग्रेसचे आहेत. त्यांचे बंड शमविण्याचा आटोकाट प्रयत्न कॉंग्रेस करत असतानाच शेजारच्या गोव्यात पक्षाला मोठा हादरा बसला. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणूनही कॉंग्रेसची गोव्यातील ताकद क्षीण होणार आहे. भाजपमध्ये विलीन झालेल्या कॉंग्रेसच्या गटात विधानसभेतील विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांचाही समावेश आहे. एकूण 40 सदस्यसंख्या असलेल्या गोवा विधानसभेची निवडणूक 2017 मध्ये झाली.

त्या निवडणुकीत सर्वांत मोठा पक्ष ठरूनही कॉंग्रेसला सरकार स्थापण्यात अपयश आले. त्यावेळी भाजपने वेगवान हालचाली करून लहान पक्षांची मदत घेत गोव्यात सरकार स्थापन केले. आता लोकसभा निवडणुकीतील पीछेहाटीनंतर कॉंग्रेसला इतर राज्यांप्रमाणेच गोव्यातही गळती लागली. त्यामुळे कॉंग्रेसचे संख्याबळ केवळ 5 वर आले आहे. तर भाजपचे संख्याबळ तब्बल 27 वर पोहचले आहे. सध्या गोव्यात भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडी सत्तेवर आहे. ताज्या घडामोडीमुळे भाजपला सत्तेवर राहण्यासाठी मित्रपक्षांची गरज भासणार नाही. त्यासंदर्भात भाजप आता काय निर्णय घेणार याविषयी उत्सुकता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)