वाराणसीच्या जागे विषयी कॉंग्रेसचा सस्पेंस कायम

नरेंद्र मोदींच्या विरोधात थेट प्रियांकाना मैदानात उतरवण्याची शक्‍यता
नवी दिल्ली – कॉंग्रेस तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात थेट प्रियांका गांधी यांनाच वाराणसी मतदार संघातून निवडणूक रिंगणात उतरवले जाण्याच्या चर्चेने जोर धरला आहे. कॉंग्रेसने आज उत्तरप्रदेशातील आणखी आठ जागांच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे पण त्यात त्यांनी वाराणसीच्या उमेदवाराचे नाव घोषित केलेले नाही त्यामुळे ही चर्चा अधिकच रंगली आहे.

प्रियांका गांधी या सध्या पुर्व उत्तरप्रदेशात प्रचारासाठी व्यस्त आहेत. त्यांना तेथील कार्यकर्त्यांनी काही दिवसांपुर्वी रायबरेलीतून उमेदवारी दाखल करण्याची सुचना केली होती पण त्यांना प्रतिसाद देताना प्रियांका गांधी यांनी रायबरेलीच का थेट वाराणसीच का नको असा प्रतिप्रश्‍न केला होता तेव्हा पासून या चर्चेला उधाण आले आहे. पण त्यावर कॉंग्रेसकडून अद्याप कोणतीच प्रतिक्रीया देण्यात आलेली नाही. आज कॉंग्रेसने उत्तरप्रदेशातील उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली त्यात आठ लोकसभा मतदार संघातील उमेदवारांचा समावेश आहे. पण त्यांनी अद्याप लखनौ बरोबरच वाराणसीचा उमेदवार जाहींर केलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाची भाजपने या आधीच घोषणा केली आहे. पण त्यांनी अद्याप तेथून अर्ज दाखल केलेला नाही. कदाचित मोदींनी तेथे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर लगेच तेथे प्रियांका गांधी यांचाही अर्ज दाखल केला जाऊ शकतो अशी अटकळ बांधली जात असून त्या विषयी माध्यमांमधूनही उलटसुलट बातम्या प्रकाशित केल्या जात आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)