गांधी परिवाराबाहेरील व्यक्तीला कॉंग्रेसने अध्यक्ष करून दाखवावे 

मोदींचे आव्हान: चहावाला पंतप्रधान बनल्याचे पचलेले नाही

अंबिकापूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी जनतेऐवजी देशाचे पहिले पंतप्रधान दिवंगत पं.जवाहरलाल नेहरू यांना आपल्या पंतप्रधान बनण्याचे श्रेय देत असल्याबद्दल कॉंग्रेसवर जोरदार पलटवार केला. कॉंग्रेसला लोकशाहीबद्दल एवढा आदर असेल तर त्या पक्षाने एक छोटी गोष्ट करावी. गांधी परिवाराबाहेरील एखाद्या चांगल्या व्यक्तीला त्या पक्षाने केवळ पाच वर्षांसाठी अध्यक्ष करून दाखवावे, असे आव्हान मोदींनी दिले.

नेहरूंनी निर्माण केलेल्या संस्थात्मक रचनेमुळेच एक चहावालाही (मोदी) देशाचा पंतप्रधान बनू शकतो, असे वक्तव्य अलिकडेच कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी केले. तर कॉंग्रेसने लोकशाहीचे जतन केल्यानेच चहावाला पंतप्रधान होऊ शकतो, असे त्या पक्षाचे आणखी एक नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले. त्या वक्तव्यांचा मोदींनी छत्तिसगढमधील भाजपच्या सभेत समाचार घेतला. देशाच्या लोकशाहीचे कंत्राट केवळ एका परिवाराला (गांधी) दिले गेलेले नाही.ब्रिटीशांनी देशाचे नाव आपल्यावरून ठेवल्याचे त्या परिवाराला वाटते, असा शाब्दिक टोला मोदींनी लगावला.

गांधी परिवाराच्या चार पिढ्यांनी देशावर राज्य केले. मात्र, एक चहावाला, गरीब आईचा मुलगा पंतप्रधान बनू शकतो हे ते अजूनही पचवू शकलेले नाहीत. गरिबांना भेडसावणाऱ्या समस्यांची जाणीव तुम्हाला होऊ शकत नाही. चहावालाच त्या समस्या जाणू शकतो, अशा शब्दांत मोदींनी कॉंग्रेस आणि गांधी परिवाराला लक्ष्य केले. मात्र, ही टीका करताना त्यांनी नामोल्लेख टाळला. नोटाबंदीवरून कॉंग्रेस सतत मोदींना घेरण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावरून प्रत्युत्तर देताना मोदी म्हणाले, एका फटक्‍यात बिछान्याखाली आणि पोत्यांत ठेवलेले पैसे गेल्याने ते पाऊल त्यांना अजूनही डाचत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)