मध्य प्रदेश – भाजपचे जेष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना मध्यप्रदेश काँग्रेस कार्यकर्त्यांनी आगळ्यावेगळ्या भेटवस्तू पाठवल्या आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की, मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकांनंतर जनतेने काँग्रेसच्या पारड्यात जनमत दिल्याने येथील शिवराजसिंह चौहानांच्या नेतृत्वाखालील भाजपसरकारला पायउतार व्हावे लागले होते. काँग्रेसने विधानसभा निवडणुकांदरम्यान मध्य प्रदेशातील शेतकरी वर्गाला कर्जमाफीचे आश्वासन देत निवडणूक जिंकल्याने काँग्रेसने देखील सत्तेत आल्याबरोबर राज्यामध्ये शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती.
दरम्यान, आता देशभरामध्ये लोकसभा निवडणूक सुरु असल्याने मध्य प्रदेशातील राजकीय तापमान देखील भलतेच वाढले असून आता मध्य प्रदेशात सत्तेत असलेले काँग्रेस लोकसभा उमेदवारांच्या निवडणूक प्रचार सभांमध्ये शेतकरी कर्जमाफी केली असल्याचा दावा करत आहे तर विरोधात असलेली भाजप शेतकरी कर्ज माफी झाली नसल्याचं सांगत आहे.
याच पार्श्ववभूमीवर आता निवडणूक प्रचार सभांमध्ये सातत्याने मध्य प्रदेशात शेतकरी कर्जमाफी झाली नसल्याचा दावा करणारे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना मध्यप्रदेश काँग्रेसकडून प्रतीकात्मक उत्तर देण्यात आले आहे. मध्यप्रदेश काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवराजसिंह चौहान यांना आयड्रॉप आणि चवनप्राश अशा आगळ्यावेगळ्या भेटवस्तू पाठवल्या आहेत. मध्य प्रदेशात शेतकरी कर्जमाफी झाली असली तरी शिवराजसिंह चौहान यांना दृष्टीदोष असल्याने त्यांना ती दिसत नाही आणि स्मरणशक्ती कमी झाल्याने त्यांना कर्जमाफी झाल्याचे सांगितले तरी त्यांना ते पुन्हा आठवत नाही त्यामुळे त्यांच्या दृष्टीसाठी आयड्रॉप आणि स्मरणशक्तीसाठी चावनप्राश देत असल्याचं काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगितलं.
यापूर्वी देखील मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे जेष्ठ नेते सुरेश पचौरी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी शेतकरी कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची माहिती देणारी कागदपत्रे ठेवली होती.
Bhopal: MP Congress workers are sending eye-drops, 'chyawanprash' & almonds to ex-CM SS Chouhan. Say, "He lies about farm loan waiver & state govt's others decisions. We wanted him to know the reality but it seems his eyesight&memory has weakened. We're sending this to cure him." pic.twitter.com/MkbjByYKv6
— ANI (@ANI) May 8, 2019