कॉंग्रेसमधील राजीनामासत्र थांबेना…

आता पश्‍चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष पायउतार

कोलकता- लोकसभा निवडणुकीतील नामुष्कीजनक पीछेहाटीनंतर कॉंग्रेसमधील राजीनामासत्र कायम आहे. आता पक्षाचे पश्‍चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष सोमेन मित्रा यांची पदावरून पायउतार होणाऱ्यांमध्ये भर पडली आहे.

मित्रा यांनी कॉंग्रेसच्या पश्‍चिम बंगालमधील सुमार कामगिरीची जबाबदारी स्वीकारत प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र, कॉंग्रेसचे प्रभारी गौरव गोगोई यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही. मित्रा यांनी प्रदेशाध्यक्षपदावर कायम राहण्याची विनंती गोगोई यांनी केली.

पश्‍चिम बंगालमध्ये लोकसभेच्या एकूण 42 जागा आहेत. त्यातील केवळ 2 जागा कॉंग्रेसला जिंकता आल्या. मागील निवडणुकीत त्या पक्षाला 4 जागा मिळाल्या होत्या. दरम्यान, कॉंग्रेसची देशभरात पीछेहाट झाल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी काही दिवसांपूूर्वी पक्षाध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव दिला.

त्यानंतर मागील आठवड्यात त्यांनी राजीनाम्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. राहुल यांनी उचललेल्या पाऊलानंतर पक्षात राजीनामासत्र सुरू झाले आहे. आतापर्यंत अनेक नेत्यांनी त्यांच्या पदांचा राजीनामा दिला आहे. आता पक्षाला नव्या अध्यक्षाची आणि संघटनात्मक फेररचनेची प्रतीक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)