विखेंच्या हालचालींवर कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींचा वॉच!

File Photo

डॉ. सुजय यांचा भाजपमधील पक्षप्रवेश हा दिल्ली स्थित पक्षश्रेष्ठींना चांगलाच खुपला

नगर: कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर डॉ. सुजय यांचा पक्षप्रवेशाने अखिल भारतीय कॉंग्रेसला चांगलेच सावध केले आहे. डॉ. सुजय यांच्या या पक्षप्रवेशात राज्यातील बड्या नेत्यांचा गोपनीय पाठिंबा असणार, हे लक्षात घेऊन दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी त्याचे दूरगामी आणि आगामी लोकसभा निवडणुकीवर काय परिणाम होतील, याची चाचपणी सुरू केली आहे. नगरमध्ये पक्षाचे राष्ट्रीय सचिव डॉ. वाशमीचंद रेड्डी यांचा दौरा त्याच अनुषंगाने होता, अशी चर्चा रंगली आहे.

नगर दक्षिणमध्ये गेल्या तीन वर्षांपासून डॉ. सुजय विखे पाटील यांनी निवडणुकीची पेरणी केली आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत नगर दक्षिणची जागा ही राष्ट्रवादीकडे आहे. विखे पाटील हे कॉंग्रेसमध्ये आहेत. आघाडीत खलबते करून ही जागा पुत्रासाठी पदरात पाडून घेता येईल, अशी तयारी कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मात्र ही जागा कॉंग्रेसला न सोडता, ती राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची केली आहे. लोकसभा निवडणूक कोणत्याही परिस्थिती लढवायचीच, अशा तयारीत असलेले डॉ. सुजय विखे पाटील यांनी शेवटी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

डॉ. सुजय यांच्या भाजप प्रवेशाने नगरसह राज्यातील विखे पाटील यांच्या राजकीय समीकरणांवर परिणाम झाला आहे. वडील राधाकृष्ण विखे पाटील हे कॉंग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते आहेत. डॉ. सुजय यांचा भाजपमधील पक्षप्रवेश हा दिल्ली स्थित पक्षश्रेष्ठींना चांगलाच खुपला आहे. विखे पाटील यांच्या बंडखोरीचा इतिहास गांधी घराण्याला चांगलाच माहित आहे. तो लक्षात घेऊन पक्षश्रेष्ठींनी डॉ. विखे पाटील यांच्या भाजप पक्षप्रवेशाने नगरसह राज्यातील राजकीय समीकरणांवर काय परिणाम झाला आहे, याची चाचपणी सुरू केली आहे. त्यासाठी नगरमध्ये पक्षाचे राष्ट्रीय सचिव डॉ. वामशीचंद रेड्डी येऊन गेले.

नगर जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या ब्लॉक कमिटींनुसार त्यांनी आढावा घेतला आहे. जिल्ह्यात एकूण 19 ब्लॉक कमिटी आहेत. यातील किती कार्यकर्ते डॉ. सुजय यांच्याबरोबर आहेत, याची त्यांनी चाचपणी केली. त्यात काही मुद्दे त्यांनी ठळकपणे नोंदविले आहेत. डॉ. रेड्डी त्याचा खुलासा हा पक्षश्रेष्ठींकडे पाठविणाऱ्या अहवालातच करणार आहेत, असे सांगण्यात येते. डॉ. सुजय यांच्या भाजप पक्षप्रवेशाने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची भविष्यातील राजकीय समीकरणे कशी असतील, याचाही अंदाज डॉ. रेड्डी हे निरीक्षणातून बांधणार आणि नोंदविणार असल्याचे सांगितले जाते.

डॉ. रेड्डी यांचा राजकीय समतोल

डॉ. वाशमीचंद रेड्डी यांचा राजकीय समतोल, हा देखील नगरच्या कार्यकर्त्यांनी जवळून पाहिला. यातून पक्षश्रेष्ठींनी त्यांना किती बारकाईने नगर दौऱ्यावर पाठविले असेल, याचीच प्रचिती येते. डॉ. रेड्डी हे सुरूवातीला संगमनेर येथे आले. कॉंग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. तिथे ग्रामीण कॉंग्रेसचा आढावा घेतला. त्यानंतर तेथून युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या वाहनातून नगरमध्ये आहे. शहरातील कॉंग्रेस कार्यालयात त्यांनी आढावा बैठकीत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. डॉ. रेड्डी येथून निघताना विखे समर्थक युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस हेमंत ओगले यांच्या वाहनातून शिर्डीच्या दिशेने विमानतळावर रवाना झाले. यावेळी वाहनात असलेले थोरात गटाच्या दोघा समर्थकांना खाली उतरविले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)