कॉंग्रेसमध्ये उमेदवारी घोळ; नितीन राऊत मैदानातून बाहेर 

संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली – रामटेक लोकसभा मतदारसंघातून माजी मंत्री नितीन राऊत यांनी लढावे असे आदेश कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले होते. परंतु, एबी फॉर्म उपलब्ध न झाल्यामुळे राऊत यांना उमेदवारी अर्ज दाखल करता आला नसल्याची चर्चा कॉंग्रेस मुख्यालयात रंगली आहे.

कॉंग्रेसमधील सूत्राने नाव न छापण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज कॉंग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांच्याऐवजी नितीन राऊत यांना रामटेकमधून लढविण्याची भूमिका घेतली होती. परंतु, महाराष्ट्रातील नेत्यांच्या असहकार आंदोलनामुळे राऊत यांना आज उमेदवारी अर्ज भरता आला नाही. यामुळे अध्यक्षांच्या निर्देशाकडे पदाधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात असेल तर कॉंग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी किती फोफावली आहे, याचा प्रत्यय येतो, असे सूत्राचे म्हणणे आहे.

सविस्तर वृत्त असे की, कॉंग्रेसने रामटेकमधून किशोर गजभिये यांना उमेदवारी दिली आहे. परंतु, नितीन राऊत हे कॉंग्रेसच्या एससी विभागाचे प्रमुख आहेत. यामुळे रामटेकमधून त्यांनी निवडणूक लढवावी अशी भूमिका राहुल गांधी यांनी आज कॉंग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत घेतली. कॉंग्रेस अध्यक्षांचा हा संदेश नितीन राऊत यांना देण्यात आला. परंतु, राज्यांतील नेत्यांनी एबी फॉर्म न दिल्यामुळे त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही.

मुळात, राहुल गांधी यांचा संदेश देण्यासाठी राऊत यांना फोन केला तेव्हा त्यांचा फोन दुसऱ्याजवळ होता. दिल्ली कार्यालयात लगेच फोन करण्याचा संदेश ठेवण्यात आला. यानुसार राऊत यांनी फोन केला. तेव्हा रामटेकमधून लढण्याची तयारी करा आणि उमेदवारी अर्ज दाखल करा असा संदेश त्यांना देण्यात आला. एबी फॉर्म नागपूर कार्यालयात उपलब्ध असल्याचेही त्यांना सांगण्यात आले. यानंतर राऊत यांनी कागदपत्रांची फाईल मागविली. आणि एबी फॉर्मसाठी संपर्क साधला तेव्हा बड्या नेत्यांचे मोबाईल बंद होते. या नेत्यांनी कॉलबॅक केला. परंतु, तोपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ संपली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)