काँग्रेस राष्ट्रवादी आपापल्या कोट्यातून प्रत्येकी २ जागा मित्रपक्षांना देणार

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वीच राज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आपल्या काही दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने  हादरा बसला आहे. भाजपने दिलेल्या धक्क्यांमुळे आता काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने आपल्या मित्रपक्षांसोबत सौम्य भूमिकेचा स्वीकार केला असून आपापल्या कोट्यातून प्रत्येकी २ जागा मित्रपक्षांना देणार असल्याचे वृत्त आहे. याआधी काँग्रेस-राष्ट्रवादी आघडीने २६-२२ असे जागावाटप करण्याचा निर्णय घेतला होता.

काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांकडून आता आपापल्या कोट्यामधून मित्रपक्षांसाठी प्रत्येकी दोन जागा सोडण्याबाबत एकमत झाले आहे. लोकसभानिवडणुकांमध्ये आघाडीकडून एकूण ४ जागा मित्रपक्षांसाठी सोडण्यात येणार असून यातील २ जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी, १ जागा बहुजन विकास आघाडीसाठी तर १ जागा अपक्ष आमदार रवी राणा यांच्यासाठी सोडण्यात येणार आहे. रवी राणा यांना सोडण्यात आलेल्या जागेवरून त्यांच्या पत्नी नवनीत कौर या निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी मित्रपक्षांना जागा सोडण्याबाबत बॅकफूटवर गेल्याचे चित्र असले तरी राज्यात युतीचा असा कोणताही इरादा नसल्याचे स्पष्ट आहे. भाजप-शिवसेना यांच्याकडून याआधीच लोकसभा निवडणुकांसाठीचे जागावाटपाचा चित्र स्पष्ट करण्यात आले असून युतीत भाजपला २५ तर शिवसेनेला २३ जागा मिळणार आहेत.

https://twitter.com/ANI/status/1109379392688541696

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)