लोकसभेच्या तोंडावर कॉंग्रेस नेत्यांना नेवाशाची आठवण

गणेश घाडगे /नेवासे: नेवासा तालुक्‍याला स्वतःचे अस्तित्व गेल्या दोन विधानसभा निवडणूकांपासून मिळाले. तेव्हापासून हा तालुका उत्तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात गेला. कम्युनिस्टाचे वर्चस्व असलेला या तालुक्‍यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी पक्षाचे पुढे वर्चस्व आहे. मात्र आता भाजपचा वरचष्मा झाला आहे. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख कॉंग्रेसमध्ये असेपर्यंत तालुक्‍यात पक्षाचे वर्चस्व होते. त्यानंतर गडाख यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाता घेतल्यानंतर कॉंग्रेस बोटावर मोजता येईल. एवढ्याच कार्यकर्त्यांचा पक्ष होता. गेल्या निवडणुकीत भाजपचे विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी कॉंग्रेस सोडल्यानंतर आज नेवाश्‍यात कॉंग्रेस औषधालाही उरली नाही. साधे पक्षाचे कार्यालय देखील आज अस्तित्वात राहिले नाही. परंतू लोकसभा निवडणूक तोंडावर आल्यानंतर जिल्ह्यातील नेत्यांना तालुका आठवला आहे.

साधे पक्ष कार्यालय देखील आज नेवासे तालुक्‍यात नाही. ही शोकांतिका आहे. तालुक्‍यातील कॉंग्रेसला ताकद देणारा नेता नसल्याने कार्यकर्ते पोरके झाले आहेत. अर्थात विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांना मानणारा मोठा वर्ग या तालुक्‍यात आहे. परंतू त्यांनी या तालुक्‍याकडे दुर्लक्ष केल्याने आज कॉंग्रेसचे जुने बहुतांशी कार्यकर्ते भाजप व गडाखांच्या शेतकरी क्रांती शेतकरी पक्षाकडे प्रभावी झाले आहे. त्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांची फळीच निकामी झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर उद्या नेवाश्‍यात कॉंग्रेस नेत्यांनी बैठक आयोजित केली आहे. ना. विखेंसह आमदार बाळासाहेब थोरात, आमदार भाऊसाहेब कांबळे आदी उपस्थित राहणार आहेत. गेल्या पाच वर्षांत कॉंग्रेसचा एकही नेता तालुक्‍यात फिरकला नाही. मुरकुटे कॉंग्रेसमध्ये असेपर्यंत ना. विखे यांनी तालुक्‍याकडे लक्ष दिले होते. परंतू मुरकुटे भाजपचे आमदार झाल्यापासून कॉंग्रेसच्या नेत्यांनी तालुक्‍याकडे पाठच फिरवली. मध्यतंरी डॉ. सुजय विखे यांनी कार्यकर्त्यांनी बैठक घेतली. परंतू त्यांनी हा तालुका दक्षिणेत येत नसल्याचे कळल्यानंतर त्यांनी पुन्हा या तालुक्‍याकडे लक्ष दिले नाही.

तालुक्‍यात राष्ट्रवादीचे वर्चस्व असतांना कॉंग्रेसला सात जिल्हा परिषदेच्या जागांपैकी तीन जागा मिळाल्या होत्या. मात्र गेल्या पाच ते सहा वर्षांपासून या तालुक्‍याकडे कॉंग्रेसच्या नेत्यांनी दुर्लक्ष केल्याने आज या तालुक्‍यात कॉंग्रेसची अवस्था दयनीय झाली आहे. नेत्यांनी तर सोडाच पण पक्ष संघटनेतील पदाधिकारी देखील नेवासा तालुका विसरले आहे. आजवरच्या एकही जिल्हाध्यक्षांनी तालुक्‍यात येवून कार्यकर्त्यांची साधी बैठक घेतली नाही. बैठक नाहीच पण ते तालुक्‍यात आले देखील नाही. त्यामुळे नेवासा तालुका कॉंग्रेसच्या गणतीमध्ये आहे की नाही अशी शंका व्यक्‍त होत असतांना आता थेट लोकसभेसाठी नेते तालुक्‍यात बैठक घेत आहे. त्यामुळे आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. ही बैठक नेमकी तालुक्‍यातील कार्यकर्त्यांसाठी आहे की उमेदवारांसाठी हे कळत नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)