भाजपाला कॉंग्रेस हाच सक्षम पर्याय : शरद पवार

आगामी निवडणुकीत देशातील चित्र बदलणार

मतभेद विसरून सर्वांनी एकत्र येण्याचे केले आवाहन

शिवसेना-भाजप एकत्र येणार
शिवसेना आणि भाजप सत्तेत असले तरी या दोन्ही पक्षांमध्ये वितुष्ट आहे. आगामी निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र येणार नाही असे बोलले जात असले तरी निवडणूकीपर्यंत भाजप नेतृत्वाला ठोकण्याचे काम शिवसेना करेल. त्यानंतर निवडणूकीमध्ये हे दोन्ही पक्ष एकत्र येतील याबाबत शंका नाही, असे भाकीत शरद पवार यांनी वर्तवले. तसेच कॉंग्रेसने नेतृत्व नवीन पिढीकडे सोपवले ते लोकांनी मान्य केले आहे, असे सांगतानाच आघाडी नाही. मात्र देशपातळीवरील प्रश्न सोडवण्यासाठी आपापसातील मतभेद विसरुन सर्वांनी एकत्र आले पाहिजे, अशी स्पष्ट भूमिकाही त्यांनी मांडली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुंबई: पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे जे निकाल आले आहेत, यावरून भाजप सोडून इतर सर्व पक्ष समाधानी आहेत. त्यामुळे भाजपाला सक्षम पर्याय देण्यासाठी कॉंग्रेस हाच एकमेव पर्याय आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले. हीच संधी साधून देशपातळीवरील प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी मतभेद विसरुन एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या 78 व्या वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून अभिष्टचिंतन स्वीकारले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पवार यांनी पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाविषयी आपली भूमिका मांडली. कालचे निकाल पाहता लोकांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे ही परिवर्तनाची सुरुवात असून यापुढे लोकांना ज्याठिकाणी संधी मिळेल त्या ठिकाणी आणि ज्यावेळी निवडणूका होतील त्यावेळी देशातील चित्र बदललेले दिसेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

सुप्रिम कोर्टाच्या चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेतली… आरबीआयच्या गव्हर्नरची नेमणूक सत्ताधारी पक्षांनी केली होती. त्याचाही राजीनामा त्यांनी दिला आहे… सीबीआयमधील वाद समोर आला आहे. अशा स्वायत्त संस्थाबद्दल सरकारने काही मर्यादा ठेवायला पाहिजे होत्या, असे सांगतानाच पंतप्रधानांनी जी काही आश्वासने दिली होती ती या निवडणूकीत ते विसरले आणि फक्त एका कुटुंबाविरोधात बोलत राहिले. ज्यांनी पंडित नेहरु, इंदिरा गांधी यांना पाहिले नाही. मात्र तरीही एका कुटुंबावर हल्ला करत राहिले, त्याचा हा असा परिणाम निघाला आहे, असा टोला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला.

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनीही शरद पवार यांची भेट घेऊन अभिष्टचिंतन केले. यावेळी त्यांच्यासोबत विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे हे सुद्धा उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)