पंजाबमध्ये काँग्रेस सुसाट?

– व्ही. के. कौर

पंजाबमध्ये लोकसभेच्या एकूण 13 जागा आहेत. 2009च्या निवडणुकीत कॉंग्रेसला 8, अकाली दलाला 4 तर भारतीय जनता पक्षाला 1 जागा मिळाली होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षामुळे जागांचे गणित बदलले. परिणामी, गतवेळी भाजपाने 2 जागांवर विजय मिळवला होता; तर शिरोमणी अकाली दलाला 4 जागा जिंकता आल्या होत्या. कॉंग्रेसने 3, तर आम आदमी पक्षाने 4 जागांवर विजय मिळवला होता. मिळालेल्या मतांची टक्‍केवारी पाहिल्यास कॉंग्रेस 33.2 टके, शिरोमणी अकाली दल 26.4 टक्‍के, आम आदमी पक्ष 24.5 टक्‍के आणि भाजपा 8.8 टक्‍के अशी क्रमवारी होती.

या राज्यात यंदा 1.97 कोटी एकूण मतदार असून यामध्ये 1.04 कोटी पुरुष मतदार, 93 लाख महिला, तृतियपंथी 380 आणि एनआरआय 281 मतदार आहेत. पंजाबमध्ये धर्मानुसार विचार करता भलेही शीख (57.68 टक्‍के) आणि हिंदू धर्मियांची (38.48 टक्‍के) संख्या जास्त असली तरी जातीनुसार विचार करता सर्वाधिक मतदार अनुसुचित जातीचे आहेत. ही संख्या 88.6 लाख इतकी म्हणजे राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या 31.9 टक्‍के आहे. पंजाबमध्ये 32 टक्‍के ओबीसी, 31.94 टक्‍के अनुसुचित जाती, 41 टक्‍के सवर्ण आणि 3.8 टक्‍के अन्य जातींची लोकसंख्या आहेत. या राज्यात मुस्लिम लोकसंख्या 1.93 आहे. तर ख्रिश्‍चन 1.20 टक्‍के, बौद्ध 0.17, जैन 0.16 टक्‍के आहेत.

पंजाबमध्ये लोकसभा निवडणुकांची समीकरणे झपाट्याने बदलत चालली आहेत. आम आदमी पक्ष आणि शिरोमणि अकाली दलामध्ये बरीच तोडफोड झाली आहे. साहजिकच अशा वेळी कॉंग्रेस ही परिस्थिती आपल्यासाठी सुसंधी मानून पावले टाकत आहे. अर्थात विरोधी पक्षांमधील बेदिलीमुळे त्यांची मते कॉंग्रेसकडे वळणे इतके सोपे नाही. पण तरीही कॉंग्रेस इथे जोरकस प्रयत्न करत आहे.

पंजाबमध्ये यंदाच्या निवडणुकीत जनकल्याण, विकास, राष्ट्रवाद या मुद्दयांऐवजी धार्मिक मुद्दा सर्वांत वरचढ होताना दिसत आहे. 2015 मध्ये बहबल कला आणि कोटकपुरामध्ये शीखांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबाराच्या प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल, गृहमंत्री सुखबीर सिंह बादल आणि तत्कालीन डीजीपींकडे संशयाची सुई वळली आहे. त्यामुळे या राज्यातील राजकारणही याच मुद्दयावर फिरताना दिसत आहे.

दुसरीकडे आम आदमी पक्षाला रामराम करून पंजाब एकता पक्षाची स्थापना करणाऱ्या खासदारांनी बसपा आणि सीपीआय यांच्यासह पाच पक्षांना एकत्र घेऊन पंजाब डेमोक्रॅटिक अलायन्स (पीडीए) ही आघाडी तयार केली आहे. या आघाडीमुळे अनुसूचित जातीच्या मतांमध्ये विभागणी होणार आहे. बसपासोबत बनलेल्या या गठबंधनाचे लक्ष्य मालवामधील अनुसुचित जातीचे मतदारही असणार आहेत.

तिसरीकडे शिरोमणी अकाली दलाला रामराम करून नव्या पक्षाची स्थापना करणारे 12 अकाली नेते आम आदमी पक्षाशी हातमिळवणी करण्याच्या तयारीत आहेत. या सर्व बेरीज-वजाबाक्‍यांमुळे शिरोमणी अकाली दलासोबत युती करुन पंजाबमध्ये लोकसभेला सामोरा जाणारा भारतीय जनता पक्ष संभ्रमावस्थेत सापडला आहे. अकाली दलासोबत केलेल्या युतीमुळे भाजपाच्या वाट्याला गुरुदासपूर, अमृतसर आणि होशियारपूर या लोकसभेच्या तीन जागा आहेत. यापैकी गतवर्षी पोटनिवडणुकीमध्ये भाजपाने गुरदासपूरची जागा गमावली आहे. अमृतसरमधील जागा 2014 मध्येच भाजपाने गमावली होती. आता केवळ होशियारपूरची एकच जागा भाजपाकडे आहे.

पाच जागांवर सर्वांची नजर
पंजाबमधील पटियाला हे मुख्यमंत्री अमरिंदरसिंह यांचे होमग्राऊंड आहे. येथे कॉंग्रेसच्या परनीत कौर या पीडीएमध्ये सहभागी झालेले आपचे खासदार धर्मवीर गांधी यांना टक्‍कर देण्याची तयारी करत आहेत. बठिंडामध्ये खासदार हरसिमरत कौर बादल यांच्या विरोधात कॉंग्रेससह पीडीएचा उमेदवारही रिंगणात असणार आहे. गुरुदासपूरमध्ये कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांना भाजपाकडून आव्हान दिले जाणार आहे. अमृतसरमध्ये अमरिंदरसिंह यांनी 2014 मध्ये अरुण जेटली यांचा पराभव केला होता. यावेळी जेटली रिंगणात नाहीत. संगरुरमध्य आम आदमी पक्षाचे खासदार भगवंत मान बरीच विजयासाठी बरीच मेहनत घेत आहेत.

डेरे आणि अनुयायांची भूमिका मोठी
पंजाबची सर्व राजकीय गणित येथे हजारोंच्या संख्येने असणाऱ्या डेऱ्यांच्या अनुयायांच्या मतावर निर्धारित आहे. यामध्ये डेरा सच्चा सौदा, डेरा भनियारांवाले बाबा, राधा स्वामी डेरा, निरंकारी, नूरमहलमधील डेरा दिव्य जोती जागृती संस्थान आणि ज्ञरुमीमधील डेरा यांचा प्रामुख्याने समावेश होतो. या डेऱ्यांच्या अनुयायांची संख्या काही लाखांमध्ये आहे. 1998 ते 2014 या काळात पंजाबमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये डेरा सच्चा सौदा हा अकाली दल आणि भाजपाच्या युतीच्या बाजूने होता. त्यामुळे ही युती नेहमीच विजयी होत राहिली. मात्र यावेळी या डेऱ्याच्या प्रमुखाला तुरुंगात डांबण्यात आल्यामुळे त्यांचे हजारो अनुयायी भाजपा आणि अकाली दलावर कमालीचे नाराज आहेत.

एका अंदाजानुसार, पंजाबमध्ये अशा छोट्या-मोठ्या डेऱ्यांची संख्या 9000 आहे. यातील सर्वांत मोठा डेरा राधा स्वामी सत्संग ब्यास हा आहे. डेरा सच्चा सौदाचा मालवामध्ये, तर डेरा ब्यासचा माझा लोकसभा मतदारसंघात प्रभाव आहे. अर्थात, राधा स्वामी सत्संग ब्यास हे राजकारणापासून अलिप्त आहेत. या दोन डेऱ्यांचा आशिर्वाद घेण्यासाठी निवडणुकांदरम्यान बहुतांश नेते येत असतात. बठिंडामध्ये डेरा रुमीवालाचा विशेष प्रभाव आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंह हे न चुकता तेथे आशीर्वादासाठी जातात.

पक्षनिहाय मुद्दे
पंजाबमध्ये सध्या सत्तेत असणारा कॉंग्रेस पक्ष जनतेला दिलेली आश्‍वासने आणि विकासाचा हिशेब सादर करणार आहे. तथापि, विधानसभा निवडणुकांतील जाहीरनाम्यामध्ये दिलेली आश्‍वासने पूर्ण न झाल्यामुळे विरोधी पक्ष त्यांना घेरणार आहे. मात्र कॉंग्रेस या राज्यात धर्माच्या मुद्दयावर फोकस ठेवून लढताना दिसत आहे. पवित्र ग्रंथांच्या बदनामीचा मुद्दा आणि बहबल कला आणि कोटकपुरामध्ये धरणे धरणाऱ्या शीखांवर झालेला गोळीबार हे मुद्दे घेऊन कॉंग्रेस मैदानात उतरली आहे.

शिरोमणी अकाली दलाने कॅप्टन अमरिंदरसिंह सरकारच्या एकाधिकारशाहीला लक्ष्य केले आहे. तसेच नवज्योतसिंग सिद्धूने पाकिस्तानी लष्करप्रमुखांची घेतलेली गळाभेटही अकाली दलाने ऐरणीवर आणली आहे. तथापि, फाटाफूट झाल्यामुळे हा पक्ष दबावाखाली आहे. बादल पिता-पुत्र चहूबाजूंनी घेरले गेले आहेत. तसेच पंजाबमध्ये वाढत्या व्यसनाधिनतेचा, नशेबाजीचा मुद्दाही त्यांच्यासाठी त्रासदायक ठरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)