सोलापुरात काँग्रेस यंदाही अडचणीत ?

– विदुला देशपांडे ज्येष्ठ पत्रकार 

सोलापूर – सोलापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक यावेळी चांगलीच उत्कंठावर्धक होणार आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मातब्बर उमेदवार म्हणजे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे. त्यांना 2014च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या लाटेत पराभवाचा धक्‍का बसला. भाजपचे शरद बनसोडे हे निवडून आले. पण गेल्या पाच वर्षांत बनसोडे यांची खासदार म्हणून विशेष कामगिरी नाही. त्यामुळे भाजप यावेळी त्यांना उमेदवारी देईल की नाही याबाबत शंका आहे. अमर साबळे आणि अक्‍कलकोट तालुक्‍यातील गौडगाव मठाचे मठाधिपती जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांची नावे भाजपकडून चर्चेत आहेत.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून सुशीलकुमार शिंदे कॉंग्रेसतर्फे निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्या मागे लोकप्रियतेचे वलय असले तरी त्यांना या मतदारसंघात सहज विजय मिळेल असे नाही. कारण वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. कॉंग्रेससाठी ही बाब अडचणीची ठरणार आहे. कॉंग्रेसबरोबर युती करायला प्रकाश आंबेडकरांनी नकार दिला ही बाब खरे तर कॉंग्रेसला धक्‍का देणारी आहे. यामुळे कॉंग्रेसच्या अडचणींत वाढ होणार आहे. एक तर मतांची विभागणी होईल आणि त्याचा फायदा भाजपला होईल.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. विधानसभांचा विचार केला तर तेथे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसला झुकते माप आहे. मोहोळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस, सोलापूर शहर मध्य, अक्कलकोट आणि पंढरपूर विधानसभा मतदारसंघांत कॉंग्रेस आणि सोलापूर शहर उत्तर आणि सोलापूर शहर दक्षिणमधून भाजपचे आमदार आहेत.

सोलापूऱ लोकसभा मतदारसंघाचा इतिहास तसा कॉंग्रेसच्याच बाजूचा आहे. 1951च्या लोकसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे शंकर शांताराम मोरे हे सोलापूर मतदारसंघातून निवडून आले होते. 1957 पासून 1996पर्यंत या मतदारसंघात कॉंग्रेसचेच उमेदवार निवडून आले. 1996मध्ये इथे भाजपचे लिंगराज वालयाल यांनी कॉंग्रेसला आव्हान दिले आणि भाजपची पताका फडकावली. 1998मध्ये हा मतदारसंघ पुन्हा कॉंग्रेसकडे गेला, सुशीलकुमार शिंदे निवडून आले. 1999मध्ये ते पुन्हा निवडून आले. 2003मध्ये शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. त्यावेळी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे प्रतापसिंह मोहिते पाटील निवडून आले. 2004च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपने हा मतदारसंघ राखला. पण 2009मध्ये इथे पुन्हा सुशीलकुमार शिंदे निवडून आले. 2014 मध्ये हा मतदारसंघ भाजपकडे गेला. आता 2019 मध्ये हा मतदारसंघ राखण्याचे भाजप आणि कॉंग्रेस दोघांपुढेही आव्हान आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची आघाडी झाली असली तरी इतर पक्षांबरोबर आघाडी करण्यात कॉंग्रेसला यश आलेले नाही. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने कॉंग्रेसला मोठा दणका दिला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थितीही गोंधळल्यासारखीच आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवडणूक लढवणार नाही हा निश्‍चय बाजूला ठेवून आधी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असे जाहीर केले आणि आयत्या वेळी माघार घेतली. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवारही निवडणूक लढवू इच्छितात. घरातच सगळे निवडणूक लढवू लागले तर कसे हा प्रश्‍न पवारांना पडला असणार आणि म्हणून त्यांनी माघार घेतली अशी चर्चा आहे.

भाजपच्या गोटातही फारसे आलबेल नाही. या पक्षाचे राज्यसभेचे खासदार अमर साबळे इथून निवडणूक लढवू इच्छितात. आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी वातावरण निर्मिती करायलाही सुरुवात केली आहे. पण त्यांच्या नावाला फारसा अनुकूल प्रतिसाद मिळताना दिसत नाही. गौडवाड मठाचे मठाधिपती डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी हेही निवडणूक लढवायला उत्सुक आहेत. सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेटही घालून दिली आहे. डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांना भाजपची उमेदवारी मिळाली तर लिंगायत समाजाची मते भाजपकडे वळतील अशी अपेक्षा आहे. अक्कलकोट, सोलापूर, मंगळवेढा तालुका आणि सोलापूऱ शहर इथे डॉ. जयसिद्धेश्‍वर चमत्कार घडवू शकतील असा विश्‍वास विरोधकांनाही आहे. म्हणूनच त्यांनी निवडणुकीतच सहभागी होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्नही सुरू झाले आहेत. डॉ. जयसिद्धेश्‍वर यांचे कार्य आणि समाजातील स्थान यामुळे त्यांच्याबद्दल केवळ लिंगायतच नाही तर इतर समाजांमधील लोकांना आदर आणि प्रेम वाटते याचा फायदा भाजप घेऊ इच्छित आहे. म्हणूनच सोलापुरातील वरिष्ठ भाजप नेतेही त्यांच्या नावाला अनुकूलता दर्शवतील अशी चिन्हे आहेत.

2019ची निवडणूक अनेक अर्थांनी महत्त्वाची ठरणार आहे. यात स्थानिक मुद्द्यांना किती महत्त्व मिळेल हे आताच सांगता येणार नाही. पण बनसोडे यांच्याबद्दल सोलापूर मतदारसंघात नाराजी आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे दलित, मुस्लिमांची किती मते फुटतील याचा अंदाज बांधणे अवघड आहे.

वास्तविक पाहता गेल्या काही वर्षांपासून प्रकाश आंबेडकर राजकारणापासून जरा बाजूलाच पडले होते. पण दोन वर्षांपूर्वी झालेल्या यल्गार परिषदेनंतर ते एकदम राजकीयदृष्ट्या सक्रिय झाले. डॉ. बाबासाहेब यांचे नातू म्हणून त्यांच्याकडे अजूनही आदराने बघितले जाते. निवडणूक प्रचारात ते कोणती भूमिका मांडतात यावर त्यांचे यशापयश अवलंबून आहे. निवडणूक जिंकण्याची क्षमता आहे की नाही हे प्रचाराला सुरुवात झाल्यावर दिसून येईल. पण त्यांच्यामुळे कॉंग्रेसची मते विभागली जाणार हे नक्की.

सुशीलकुमार शिंदे मुरब्बी राजकारणी आहेत. पण सध्याची कॉंग्रेसची स्थिती पाहता सुशीलकुमार शिंदे यांना विजयासाठी खूप झगडावे लागणार आहे हे नक्की.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)