साद-पडसाद : राजीनाम्यानंतर गांधींशिवाय कॉंग्रेस…

सत्यवान सुरळकर

कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्षपद गांधी घराणे कधी सोडणार नाही, असे टोमणे मारणाऱ्यांना राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन चोख उत्तर दिले आहे. गांधी घराणे सत्तेसाठी हपापलेले आहे असे म्हणणाऱ्यांचेही तोंड बंद झाले आहे. स्वतःहून पंतप्रधानपद चालून आल्यावर देखील सोनिया गांधी यांनी ते पद नाकारणे व आता सतराव्या लोकसभेतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देणे या दोन घटना गांधी घराण्याविषयी लोकांचा दृष्टिकोन बदलण्यास भाग पाडणाऱ्या आहेत.

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवामुळे राहुल गांधी यांनी राजीनामा कॉंग्रेस कार्यकारिणीकडे सुपूर्त केला होता. मात्र, कार्यकारिणीने राजीनामा स्वीकारला नाही. राहुल गांधी यांनी राजीनामा देऊ नये असा सूर अनेकांनी आळवला. मात्र, राहुल गांधी आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि आता या राजीनामा वर्तुळाला पूर्णविराम मिळाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राहुल गांधी यांच्या नेतृत्वात पहिलांदाच कॉंग्रेसने लोकसभा निवडणूक लढविली. त्यात कॉंग्रेसचा पराभव झाल्यामुळे राहुल गांधींमुळे पराभव झाला अशी चर्चा फारशी झाली नाही. मुळात कॉंग्रेसकडे भाजपसारखा पंतप्रधानपदाचा चेहरा नसल्यामुळे हा पराभव झाल्याची दाट शक्‍यता आहे. आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोकसभेत कॉंग्रेसचा पराभव झाल्यास त्यास एकटे राहुल गांधी जबाबदार असतील असे विधान केले होते. अर्थात, यामागची दुखरी नस म्हणजे कॉंग्रेसने आपसोबत युती न करणे ही होय.

राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतरही अनेक खासदार, आमदार आणि कार्यकर्ते यांनी राहुल गांधीचेच नेतृत्व स्वीकारून त्यांच्या सर्व निर्णयांना पाठिंबा देऊ, असे म्हटले आहे. “राहुल यांनी केलेल्या संघर्षाची जाणीव आम्हाला आहे. त्यामुळे राजीनामा मागे घेण्याची आग्रही विनंती आम्ही त्यांना केली होती’, असे राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर राहुल यांनी अध्यक्षपद सोडले असले तरी यापुढे तेच आमचे नेते असतील, असे मत माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शिद यांनी व्यक्‍त केले. अजय माकन यांनीही राहुल गांधी यांनी योग्य निर्णय घेतला असून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. ते नेहमीच कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा आवाज बनतील, असे म्हटले आहे. “कॉंग्रेस म्हणजे गांधी घराणे’ हे समीकरण लोकांच्या मनात रुजले होते. राहुल यांच्या राजीनाम्यानंतरही हे समीकरण लोकांच्या मनात बराच काळ रुंजी घालत राहणार.

2011 सालापासून कॉंग्रेसची विविध राज्यांत पडझड सुरू झाली. त्यामुळे सोनिया गांधी यांनी राहुल गांधींकडे पक्षातील विविध महत्त्वाच्या पदांची धुरा सोपविली. सुरुवातीला कॉंग्रेसचे महासचिव व नंतर पक्षाचे उपाध्यक्ष या पदावर असताना राहुल गांधी महत्त्वाचे निर्णय घेत असत. त्यांची आई सोनिया गांधी या पक्षाच्या अध्यक्षा असूनही बऱ्यापैकी कारभार राहुल गांधींच्या हातातच सोपविला होता. त्यांच्या उपाध्यक्ष काळात व अध्यक्षपदाच्या काळात 2014 व 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला पराभवाचे तोंड पाहावे लागले. या दरम्यान कॉंग्रेसची ज्या ज्या राज्यांत सत्ता होती ती सत्ताही त्यांच्या हातातून निघून गेली.

महाराष्ट्र तर कॉंग्रेसचा बालेकिल्ला. यशवंतराव चव्हाणांपासून पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत महाराष्ट्रावर कॉंग्रेसचा पगडा होता. मात्र आता महाराष्ट्रात भाजपचे निर्विवाद वर्चस्व दिसून येत आहे. महाराष्ट्रातील मनामनात घर करून राहिलेला कॉंग्रेस पक्ष मात्र आता जवळपास संपुष्टात आला आहे की काय असे सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येते. महाराष्ट्रासारखेच अनेक राज्यांत आज कॉंग्रेस नावापुरती उरली आहे, जेथे एकेकाळी कॉंग्रेस आणि फक्‍त कॉंग्रेस हे एकच समीकरण असायचे.
पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या चार राज्यांत कॉंग्रेसची सत्ता स्थापन करण्यात राहुल यशस्वी झाले. या राज्यांत भाजपचे बऱ्याच कालावधीपासून सरकार होते. ही चार राज्ये भाजपाचे बालेकिल्ले असूनही ते कॉंग्रेसने जिंकले, त्यावेळी राहुल गांधींना चहूबाजूने वाहवा मिळाली होती. या विजयाच्या जोरावरच कॉंग्रेस सतरावी लोकसभा जिंकेल असा कॉंग्रेसमध्ये विश्‍वास निर्माण झाला होता आणि विरोधी पक्षाच्या मनात भीती निर्माण करण्यातही राहुल यशस्वी झाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची एकही संधी राहुल गांधींनी गमावली नाही. यात त्यांच्यातील आक्रमकपणा दिसून आला. मात्र तरीही लोकांच्या मनावरील मोदी पडदा बाजूला करण्यात ते यशस्वी झाले नाही.

लोकसभा पराभवानंतरही “आम्ही 52 असलो तरी सरकारला पुरून उरू’ ही एखाद्या सेनापतीच्या अंगी असलेले नेतृत्व गुणही त्यांनी दाखविले. “माझा एक कॉंग्रेसी म्हणून जन्म झाला आहे आणि पक्ष नेहमीच माझ्या सोबत राहिला आहे. कॉंग्रेस माझ्या रक्‍तात आहे आणि शेवटपर्यंत राहील’, असे पक्षाध्यक्ष पदाच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधींनी म्हटले आहे. या विधानातून त्यांची कॉंग्रेसशी असलेली नाळ किती घट्ट आहे हे दिसून येते.

1885 साली कॉंग्रेस पक्षाची “सेफ्टी व्हॉल्व’ म्हणून स्थापना झाल्याचे बोलले जाते. मात्र स्वातंत्र्य चळवळीत देशाचा चेहरा हा कॉंग्रेस होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कॉंग्रेस बरखास्त करावी, अशी मागणी महात्मा गांधी यांनी केली होती. मात्र, देशातील घराघरांत पोहोचलेली कॉंग्रेस सहजासहजी लोकांच्या मनातून जाणारी नव्हती. स्वातंत्र्यानंतर पुढे कॉंग्रेस पक्षाने अनेक काळ देशावर सत्ता गाजविली. भारताला परकीय गुलामगिरीतून बाहेर काढून विकासाच्या मार्गावर नेणारा कॉंग्रेस आजही राष्ट्रीय पक्ष असल्याने तो नामशेष होण्यापेक्षा पुन्हा उभारी घेणे आवश्‍यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)