कोपरगाव-शिर्डीत अकरा वेळा कॉंग्रेसचे वर्चस्व ; यावेळी कोण मारणार बाजी ?

एकदा अपक्ष, भाजपला, तर तीनदा शिवसेनेला मिळाली संधी ; 7 वेळा स्व. विखेंनी केले प्रतिनिधित्व

संगमनेर: सतराव्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. पूर्वीचा कोपरगाव आणि आत्ताचा शिर्डी लोकसभा मतदारसंघ 2009 पासून राखीव झाला. मतदारसंघातील सत्तेची समीकरणेच बदलली. आतापर्यंत अकरा वेळा या मतदारसंघात कॉंग्रेसने आपले वर्चस्व राखले असले, तरी गेल्या दोन निवडणुकांपासून हा मतदारसंघ हाताकडून धनुष्यबाणा’ने हिरावून घेतला. कॉंग्रेसचा हात हातात घेत सहा आणि एकदा धणुष्यबाण हाती धरत सर्वाधिक सातवेळा खासदार होण्याची संधी दिवंगत बाळासाहेब विखे यांना मिळाली. सातवेळेचा त्यांचा व दोनदा अण्णासाहेब शिंदे यांचा अपवाद वगळता दुसऱ्यांदा कोणालाही प्रतिनिधित्व करण्याची संधी या मतदारसंघाने दिली नाही.

स्वातंत्र्यानंतर 1952 पासून पूर्वीचा कोपरगाव लोकसभा मतदारसंघ हा खऱ्या अर्थाने कॉंग्रेसचा बालेकिल्ला. 19 फेब्रुवारी 2008 ला हा मतदारसंघ शिर्डी लोकसभा मतदारसंघ म्हणून अस्तित्वात आला. राखीव झालेल्या या मतदारसंघात त्यानंतर मोठ्या प्रमाणात राजकीय हालचाली घडल्या. मतदारसंघ राखीव होताच शिर्डीतून कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीकडून कपबशीच्या चिन्हावर रामदास आठवले यांनी निवडणूक लढविली. त्यांच्याविरोधात त्यावेळी मतदारसंघात तयार झालेले वातावरण आणि स्थानिक नेत्यांचा त्यांना असलेला अंतर्गत विरोध, यामुळे शिर्डी संस्थानमध्ये कार्यकारी अधिकारी राहिलेले भाऊसाहेब वाकचौरे त्यांच्याविरोधात उभे राहिले आणि निवडून देखील आले. आठवलेंचा पराभव झाल्याने हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला. शिवसेनेकडून खासदार झालेल्या वाकचौरेंना 2014 च्या निवडणुकीत मोदी लाटेचा अंदाज आला नाही आणि त्यांनी शिवसेनेची साथ सोडत कॉंग्रेसकडून उमेदवारी केली. अचानक पक्ष बदलल्याने शिवसेनेला उमेदवार मिळणे अवघड झाले आणि त्यांनी मुंबईतील सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी दिली. मोदी लाटेत अवघ्या सतरा दिवसांत लोखंडे खासदार झाले. तर पराभव होताच वाकचौरे यांनी कॉंग्रेसचा हात सोडत भाजपचे कमळ हाती धरले.

खासदार झालेल्या लोखंडेंनी मतदारसंघाकडे दुर्लक्ष केले. पाच वर्षांत त्यांनी साधे मुखदर्शनदेखील मतदारांना दिले नाही. पक्षातील चुकीच्या लोकांच्या साथ धरलेल्या लोखंडेंविरोधात पक्षातदेखील नाराजीचे वातावरण निर्माण झाले. लोखंडे यांना 2019 ची निवडणूक अवघड असल्याचे अहवाल मातोश्रीवर जाऊ लागले. युतीत जागा सेनेच्या वाट्याला गेल्याने भाजपकडून इच्छुक असलेल्या वाकचौरेंचा भ्रमनिरास झाला. त्यांनी पुन्हा मातोश्रीची दारे ठोठावून पाहिले. मात्र त्याचा फायदा झाला नाही. सेनेकडून मतदारांची नाराजी असूनही लोखंडेंनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे आता हा मतदारसंघ कॉंग्रेसला आपल्याकडे आणण्यात यश मिळते की शिवसेना हॅट्ट्रिक साधते, हे मतदानानंतर समजेलच.

1952 मध्ये पहिल्याच निवडणुकीत कॉंग्रेसकडे गेलेल्या या मतदारसंघात 1957 च्या निवडणुकीत बापू कांबळे या अपक्ष उमेदवाराचा विजय झाला. त्यानंतर 1962, 1967, 1971, 1977, 1980, 1984, 1989 आणि 1991 पर्यत कॉंग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला. 1996 मध्ये मात्र हा मतदारसंघ भाजपने आपल्याकडे खेचला. अवघ्या दोनच वर्षांत झालेल्या निवडणुकात कॉंग्रेसने पुन्हा विजय मिळविला. नंतर 1999 मध्ये शिवसेनेकडून आणि 2004 मध्ये कॉंग्रेसकडून बाळासाहेब विखे विजयी झाले. त्यानंतर मतदारसंघाची पुर्नरचना झाली आणि नंतरच्या 2009 आणि 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेला यश मिळाले. शिवसेना याही वेळी आपली यशाची परंपरा सुरू ठेवते की कॉंग्रेस ती खंडित करते, याकडे लक्ष लागले आहे.

आतापर्यंतचे कोपरगाव-शिर्डीचे खासदार

1952 : बी. आर. कानवडे (कॉंग्रेस)
1957 : बापू कांबळे (अपक्ष)
1962 : अण्णासाहेब शिंदे (कॉंग्रेस)
1967 : अण्णासाहेब शिंदे (कॉंग्रेस)
1971 : एकनाथराव विखे (कॉंग्रेस)
1977 : एकनाथराव विखे (कॉंग्रेस)
1980 : एकनाथराव विखे (कॉंग्रेस)
1984 : एकनाथराव विखे (कॉंग्रेस)
1989 : एकनाथराव विखे (कॉंग्रेस)
1991 : शंकरराव काळे (कॉंग्रेस)
1996 : भीमराव बदडे (भाजप)
1998 : प्रसाद तनपुरे (कॉंग्रेस)
1999 : एकनाथराव विखे (शिवसेना)
2004 : एकनाथराव विखे (कॉंग्रेस)
2009 : भाऊसाहेब वाकचौरे (शिवसेना)
2014 : सदाशिव लोखंडे (शिवसेना)
2019 : ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)