कॉंग्रेस जिल्हाध्यक्षचं आ. कांबळेंच्या प्रचारापासून दूर

माजीमंत्री बाळासाहेब थोरातांवर सर्व भिस्त ; विखे गट दक्षिणेत सक्रिय ; राष्ट्रवादीचे नेते संभ्रमात

जयंत कुलकर्णी /नगर: जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही मतदारसंघात प्रचाराचा ज्वर वाढू लागला आहे. नगर दक्षिणेतील काही तालुके वगळले तर कॉंग्रेसचे नेते व कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी जीवाचे रान करतांना दिसत असतांना शिर्डी लोकसभा मतदारसंघात मात्र कॉंग्रेसचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारापासून पक्षाचेच जिल्हाध्यक्ष करण ससाणे लांब असल्याचे चित्र आहे. त्यामुळे उत्तरेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. पक्षाचा जिल्हाध्यक्षच प्रचाराकडे पाठ फिरविणार असेल तर आपण तरी काम करायचे की नाही, असा प्रश्‍न पडला आहे. त्यामुळे सध्या तरी आ.कांबळे यांची सर्व भिस्त माजीमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर असल्याचे दिसत आहे.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून नगर दक्षिणेची उमेदवारी मिळाल्यानंतर नगर जिल्ह्यातील राजकीय समिकरणेच बदलली. ना.विखे हे अद्यापही कॉंग्रेसवासी असल्याचे दाखवित असले तरी प्रत्यक्षात मात्र त्यांनी पक्षासाठी काम करण्याची भूमिकाच बदलली आहे.त्यामुळे ते कॉंग्रेसमधून असूनही ते नसल्यासारखेच झाले आहेत. याचा फायदा घेवून ना. विखेंचे पक्षांतर्गत कट्टर विरोधक आ. थोरात यांनी ना. विखेंची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला. ना.विखेंचे कट्टर समर्थक आ. कांबळे यांना शिर्डी लोकसभेची उमेदवारी दिली. तसेच माजी जिल्हाध्यक्ष कै.जयंत ससाणे यांचे चिरंजीव करण यांची पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्‍ती केली. त्यामुळे या दोघांचेही ना. विखेंवर जाण्याचे मार्ग बंद करू टाकले.

परंतू श्रीरामपूरमध्ये आ. कांबळे व ससाणे यांच्यातील स्थानिक संघर्ष टोकाचा आहे. यात दुरुस्ती करण्यात अद्यापही आ. थोरात यांना यश आलेले नाही. त्यामुळे ना. विखेंची कोंडी करण्याचा प्रयत्नांना आ. कांबळे व ससाणे यांच्यातील संघर्षातमुळे खिळ बसली आहे. श्रीरामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने आ. कांबळे यांनी भूमिका घेवून ससाणे यांच्यासमोर अडचणी उभ्या केल्या. ते आजही ससाणे विसरले नाही. आजही श्रीरामपूरमधील कॉंग्रेसवर ना.विखेंचा दबदबा आहे. त्यामुळे ससाणे हे जरी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष झाले तरी त्यांनी आ.कांबळे यांच्याविरोधातील संघर्ष काही कमी केलेला नाही. ससाणे समर्थकांचा आ. कांबळे यांना विरोधच आहे. त्यामुळेच श्रीरामपूरमध्ये ससाणे समर्थक आ. कांबळेंच्या प्रचारापासून दूर आहे. ससाणेंचे कार्यकर्ते आ. कांबळेंच्या प्रचारात सक्रिय झालेले नाही.

ना. विखे यांनी अद्यापही शिर्डी लोकसभा मतदारसंघाबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट न केल्याने या मतदारसंघातील विखे गटाचे नेते व कार्यकर्ते केवळ बघ्याच्या भूमिकेत आहेत. उत्तरेतील विखे गटाचे नेते व कार्यकर्ते राजरोजपणे सध्या नगर दक्षिणेत सक्रिय झाले आहेत. अर्थात ना. विखे देखील भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ गाठीभेटी घेवून निवडणुकीचे नियोजन करीत आहे. ते भाजपच्या नियोजनाच्या बैठकांना देखील उपस्थित राहत आहेत. त्यामुळे सध्या तरी नगर दक्षिणेची निवडणूक होत नाही तोपर्यंत विखे गटाचे नेते व कार्यकर्ते शिर्डीत फिरकणार देखील नाही. हे सहाजिकच आहे. परंतू पक्षाचा जिल्हाध्यक्षच कॉंग्रेस उमेदवाराचा प्रचारात सक्रिय नाही हे चित्र कॉंग्रेसच्या दृष्टीने घातक झाले आहेत.खुद्द आ. कांबळेच्या हक्‍काच्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसबरोबर नाही. जिल्हाध्यक्ष देखील प्रचारापासून दूर असल्याने घरच्या मैदानावर आ.कांबळेंचे हाल चालले आहेत. आज कोपरगाव, राहाता हे दोन्ही तालुक्‍यातील कॉंग्रेसने ना. विखेंच्या भूमिकेबरोबर राहण्याचे स्पष्ट केले आहे.

अकोले, नेवाश्‍यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे चिन्ह घेवून मतदारासमोर जायचे आहे. त्यामुळे आता कॉंग्रेसचे चिन्ह घेवून मतदारासमोर जायचे म्हणजे विधानसभेला फटका असण्याची शक्‍यता आहे. त्या कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष करण ससाणे प्रचारापासून दूर असतील तर राष्ट्रवादीच्या नेते व कार्यकर्त्यांनी काम करणे योग्य आहे की नाही असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे सध्या तरी कांबळे यांची सर्व भिस्त संगमनेरवर म्हणजेच आ. थोरात यांच्यावर आहे.


ससाणेंचे जिल्हाध्यक्षपद ठरतंय शोभेचे

ना. विखेंबरोबर जाण्याचा मार्ग बंद करण्याच्या हेतूने आ.थोरात यांनी करण ससाणे यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदार टाकली खरी. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हाध्यक्ष म्हणून ससाणे यांना काम करण्याची मोठी संधी मिळाली. परंतू ससाणे शिर्डीत ज्या पद्धतीने आ. कांबळेंच्या प्रचारापासून दूर आहे. तसेच ते नगर दक्षिणेत देखील राष्ट्रवादीच्या उमेदवारांपासून लांबच आहेत.दक्षिणेत तालुकानिहाय कार्यकर्त्यांच्या बैठका नाही, किंवा दौरे देखील नाहीत. त्यामुळे ससाणेंचे जिल्हाध्यक्षपद हे केवळ शोभेचे पद आहे की काय अशी शंका आता कार्यकर्त्यांकडून व्यक्‍त होवू लागली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)