कॉंग्रेस शहराध्यक्ष संजय सुखधान यांचा राजीनामा

नेवासे: कॉंग्रेसचे नेवासे शहराध्यक्ष संजय सुखधान यांनी आपल्या पदाचा व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून, त्यांनी ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीत सामील होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात सुखधान यांनी कॉंग्रेस सोडल्याने आघाडीच्या उमेदाराला हक्काच्या मतदानाचा मोठा फटका बसणार आहे.

सुखधान हे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसमध्ये सक्रिय होते. नेवाशात कॉंग्रेसच्या एकमेव नगरसेविका शालिनी या संजय सुखधान यांच्या पत्नी. कॉंग्रेस व घटनापती प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुखधान यांनी नेवासे शहरासह तालुक्‍यात विविध प्रश्‍नांवर आंदोलने केली.

नेवासे शहरातील प्रभाग दोन, तीनमध्ये कचरा संकलनासाठी स्वखर्चातून घंटागाडी सुरू केली. नेवासाकरांना नेहमीच सातावणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्‍नी सुखधान यांनी दोनवर्षांपासून उन्हाळ्यातील दोन महिने या प्रभागातील नागरिकांना स्वखर्चाने टॅंकरव्दारे पाणीपुरवठा सुरू करून दिलासा दिला. लवकरच ते ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश करणार आहेत.

ज्या समाजाच्या लोकसंख्येच्या आधारावर शिर्डी मतदारसंघ आरक्षित झाला, त्याच समाजाला निदान कॉंग्रेसतरी उमेदवारी देईल, अशी अपेक्षा होती. मात्र सर्वच पक्षांनी या समाजाला डावलल्याने समाजाच्या स्वाभिमानासाठी मी पक्षाचा राजीनामा दिला असल्याचे संजय सुखधान यांनी सागितले. सुखधान यांनी राजीनामा दिल्याने कॉंग्रेसमधील एक नेता गेल्याने कॉंग्रेसचे नुकसान झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)