पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांना प्राधान्य
पुणे – पुणे लोकसभा मतदारसंघासाठी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवाराची घोषणा 20 मार्चनंतरच होण्याची शक्यता आहे. राज्यात पहिल्या पाच उमेदवारांची यादी जाहीर केली असली तरी, उर्वरीत उमेदवार निवडीत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांची आधी घोषणा केली जाणार आहे. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता वर्तविती जात आहे.
कॉंग्रेसच्या केंद्रीय निवड समितीची दोन दिवसीय बैठक दिल्ली येथे झाली असून राज्यातील उमेदवारीबाबत त्यात चर्चा झाली आहे. त्यानुसार, पक्षाकडून उमेदवारांची बहुतांशे नावे निश्चित केली असून पुण्याच्या जागेबाबत अद्यापही पक्ष संभ्रमात असल्याचे चित्र आहे. त्यातच, पुण्यात तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळे पक्षाकडून पुण्याबाबत निर्णय तूर्तास काही दिवस लांबणीवर ठेवण्यात टाकत, पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांची नावे निश्चित केली असून त्यांची घोषणा रविवारी होण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान, शनिवारी दिल्लीतून पक्षाने आपली तिसरी यादी जाहीर केली असून त्यात 18 जणांची नावे जाहीर केली आहेत. त्यात प्रामुख्याने सिक्कीम, आसाम, मेघालय, तेलंगणा आणि उत्तर प्रदेशातील एका जागेचा समावेश आहे. दरम्यान, दिल्ली येथील बैठकीनंतर काही इच्छुकांनी पुन्हा पुण्याकडे प्रयाण केले असून काही इच्छूक अद्यापही दिल्लीतच असून त्यांच्याकडून उमेदवारीसाठी जोरदार फिल्डींग लावली जात आहे.
उमेदवारीस निवडीस दिरंगाई; कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
उमेदवारीच निश्चित होत नसल्याने कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता पसरली आहे. संपूर्ण दिवसभर कार्यकर्ते पक्ष कार्यालयात हेलपाटे घातल असून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे उमेदवारीबाबत विचारणा करून माघारी फिरत आहेत. तर निवडणुकीचा उमेदवार लवकर जाहीर न झाल्यास प्रचार कसा करायचा असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला असून त्यांच्याकडून उमेदवारीस होणाऱ्या दिरंगाईबाबत खासगीत नाराजी व्यक्त केली जात आहे.