धर्मसंकट आले तरी दिलेल्या शब्दाला पक्‍का ; सुजय विखेंचाच प्रचार करणार- आ. कर्डिले

व्यक्‍तीद्वेष ठेवून राजकीय सूडबुध्दीने काम केले- डॉ. विखे

राहुरी: कारखाना निवडणूकीत जे विजयी होतील त्यांना सहकार्य करण्याचा शब्द मी दिलेला होता. तो शब्द मी पाळला. आता या निवडणुकीत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शब्द दिला आहे. मी शब्दाला पक्का असल्याने माझे समोर किती ही धर्मसंकट असले तरीही मी भाजप व मित्रपक्षांचे उमेदवार डॉ.सुजय विखेंचाच प्रचार करणार याचा पुनरुच्चार आमदार शिवाजी कर्डिले यांनी आज केला.

पांडुरंग लॉंन्स येथे डॉ. विखेंच्या प्रचार सभेत आ. कर्डिले अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी डॉ. विखे, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, विक्रम तांबे, नगराध्यक्ष सत्यजीत कदम, माजी आमदार चंद्रशेखर कदम, कारखाना अध्यक्ष ऊदयसिंह पाटील, उपाध्यक्ष श्‍यामराव निमसे, उत्तमराव म्हसे, अँड. तान्हाजीराव धसाळ, सुरेश करपे, किशोर वने, शहाजी ठाकूर, नानासाहेब जुंदारे, वैशाली नान्नोर उपस्थित होते.

आ. कर्डिले पुढे म्हणाले, सहा महिन्यापूर्वीच मी डॉ. विखेंना त्यांचे राजकीय भविष्य सांगितले होते. तुम्ही आमच्या पक्षात या. खासदार होताल. आज ते पक्षात आले आहेत. देशातील सर्वाधिक मताधिक्‍याने पहिल्या पाच विजयी खासदारात त्यांचा समावेश असेल. मागील लोकसभा निवडणुकीत आघाडीने मलाच उमेदवारी देवून पक्षातीलच गटबाजीने मला पाडले. तसेच डॉ. विखेंच्या बाबतीत आघाडीने केले असते. म्हणूनच मी त्यांना सहा महिन्यापूर्वीच पक्ष प्रवेशाचे आमंत्रण दिले होते. पक्षाने मला पण आँफर दिली होती. पण मी डॉ. विखेंना शब्द दिला होता. प्रसार माध्यमांनी मला किंगमेकर बनवले आहे. आता मी ज्याच्या बाजूला तो नेहमीच विजयी होतो. तीनशे कोटींचा तोटा असलेला तनपुरे सुरु करण्याचे अनेक पर्याय हाताळले. पण यश आले नाही. आश्वासनाप्रमाणे तनपुरे चालविण्यास सहकार्य केले. मी शेतकऱ्यांचाच विचार केला. दिलेला शब्द पाळला. लोकसभा निवडणुकीत मुलाप्रमाणे डॉ.विखेंनी माझा सल्ला घेतला. आता पालकाच्या भुमिकेतूनच मी त्यांचे मागे ठामपणे उभा आहे.

डॉ. विखे म्हणाले, कारखाना प्रकरणी आ.कर्डिलेंनी माझ्यावर मुलासारखा विश्‍वास दाखविला.तीच भूमिका लोकसभा निवडणुकीत कायम राहील. आज प्रचारास येणारे शेजारील तालुक्‍यांना विचारा की आमची कामधेनू तीन वर्षे बंद होती. तेव्हा तुम्ही कोठे होतात. आता मते मागण्याचा नैतिक अधिकार केवल मला आणि आमदारांनाच आहे. आम्ही कारखाना सुरु केला. एफआरपीप्रमाणे पेमेंट दिले आहे. थकीत पेमेंट ही निश्‍चित देऊ. त्यांना तालुक्‍यातील कोणत्याही प्रश्‍नांशी काहीही देणेघेणे नाही. 36 वर्षाचा मुलाच्या विरोधात सर्वच पक्ष एकत्र आले आहेत. मला समजत नाही की असा मी काय अपराध केला आहे. उमेदवारांची माहिती घ्या. त्या उत्तराच्या आधाराने मतदान करा.

आपल्याला पंतप्रधान निवडायचा आहे. देशाचे नेतृत्व मोदीकडे परत द्यायचे आहे. यांचा नेताच अजून ठरलेला नाही. सर्वसामान्य जनतेचे प्रश्‍न कोण सोडवत आहे. साखर कारखानदारीचे प्रश्‍न याचा केंद्र सरकारने सोडवले. शेतकऱ्यांचे प्रश्न हेच सरकार सोडवत आहे. असे सांगून डॉ. विखे म्हणाले, 29 रुपयांनी साखर विक्री झाली. तेव्हा शरद पवारांनी काहीच केले नाही. या सरकारमुळे 2900-3100 रुपयांनी साखर विक्री झाली. एफआरपी मिळत आहे. 2008 च्या कर्जमाफीत राज्याला चार हजार कोटी मिळाले. सध्याच्या योजनेत 21500 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली. प्रत्यक्ष विकास की पोकळ आश्वासन अशी ही लढाई आहे. व्यक्ती द्वेष ठेवून राजकीय सूडबुध्दीने काम झाले. मला निश्‍चितच मताधिक्क मिळेल.

यावेळी तालुका विकास मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष चाचा तनपुरे यांचा सत्कार आ. कर्डिले यांचे हस्ते झाला. प्रा. बेरड, खेवरे, तांबे यांची यावेळी भाषणे झाली. कदम यांनी प्रास्तविक केले. विरोधी पक्षनेते दादा सोनवणे यांनी आभार मानले.

आता ना. विखेंनी भाजपत यावे

माझे सर्वच पक्ष फिरून झाले आहेत. मात्र मी याच पक्षात सुखी समाधानी आहे. तेच समाधान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेंना मिळावे म्हणून व्याह्यांना भाजपत येण्याचा सल्ला द्या असे आवाहन त्यांनी कारखाना संचालक नामदेव ढोकणे यांना केले.

अन्‌ हशा झाला…

मला अन्य भाषा येत नाहीत. परदेश दौरा असताना एका हॉटेलमध्ये समोरच्या डिशकडे बोट दाखवून खाद्यपदार्थ मागितले तर रुमचे लॉंक लागले तर काऊंटरला धीस इज लॉंक असे सांगत माझी सुटका केल्याचे आ. कर्डिलेंनी सांगितले तेव्हा एकच हशा झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)