संगणक टंकलेखन, लघुलेखन संस्थांच्या मनमानीला “चाप’

टायपिंगच्या परीक्षेसाठी मुदतीत अर्ज न भरल्यास संस्थांकडून दंड वसूल करणार

पुणे – शासकीय संगणक टायपिंग परीक्षांसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज मुदतीत न भरल्यास व अर्जातील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी प्रशिक्षण संस्थांकडून दंड वसूल करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आलेला आहे. याचा संस्थांनी धसकाच घेतला आहे. परीक्षा परिषदेच्या वतीने शासकीय संगणक टायपिंग परीक्षा, शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा, स्पेशल स्किल इन कॉम्प्युटर टायपिंग फॉर इन्स्ट्रक्‍टर्स अँड स्टुड्‌टस या परीक्षा दरवर्षी घेण्यात येतात. यासाठी विविध जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात फी घेण्यात येते.

आतापर्यंत संस्थांकडून विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज मुदतीनंतरही भरण्यात येत असत. तसेच अर्जांमध्ये बऱ्याचशा चूकाही सतत केल्या जातात. परीक्षेच्या आधल्या दिवसापर्यंत संस्थांकडून परीक्षा परिषदेकडे अर्ज केले जातात. मात्र यामुळे परीक्षा परिषदेला ऐनवेळी अडचणी निर्माण होत असल्याचे उघडकीस आले आहे. संस्थाच्या या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी आता परीक्षा परिषदेकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

आता जुलै व ऑगस्ट मध्ये या परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षांचे अर्ज भरण्यासाठी 30 दिवसांची नियमित मुदत देण्यात येणार आहे. या मुदतीनंतर दाखल होणाऱ्या प्रत्येक अर्जासाठी दंड लागू होणार आहे. नियमित मुदतीनंतर 7 दिवसांत अर्ज भरण्यासाठी 100 रुपये विलंब शुल्क संस्थाकडून वसूल करण्यात येणार आहे. विलंब शुल्काच्या मुदतीनंतर आलेल्या अर्जांसाठी नियमित शुल्क, विलंब शुल्क व प्रत्येक दिवसाला 50 रुपये अतिविलंब शुल्क आकारणी करण्यात येणार आहे. याबाबतच्या निर्णय परिषदेच्या कार्यकारी समितीमध्ये नुकताच घेण्यात आलेला आहे.

संस्थाकडून विद्यार्थ्यांचे परीक्षांचे अर्ज भरताना अनेक चुका करण्यात येतात. विद्यार्थ्यांचे स्वत:चे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, विषय बदल, फोटा बदल आदींच्या चुका होतात. या चूकांची दुरुस्ती करण्यासाठीही आता नव्याने दंड आकारणी करण्यात येणार आहे. परीक्षेनंतर माहितीमध्ये कुठलाही बदल करण्यात येणार नाही. प्रवेशपत्र मिळेपर्यंत अर्जात दुरुस्त्या करावयाच्या असल्यास प्रति विद्यार्थी, प्रति विषयाला 100 रुपये तसेच प्रवेशपत्र मिळाल्यानंतर परीक्षेपूर्वीपर्यंत 200 रुपये याप्रमाणे दंड आकारणी करण्यात येणार आहे.

पुढील आठवड्यात अधिसूचना

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात परीक्षेची अधिसूचना परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या टायपिंग प्रशिक्षण देणाऱ्या सर्वच संस्थांवर दंडात्मक कारवाई होणार आहे. यात कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)