ग्रामपंचायतीत देसाई-पाटणकर गटाला संमिश्र यश

चाफळ, पाबळवाडीवर सेनेची तर विहे, डाकेवाडीवर पाटणकर गटाची बाजी

पाटण – पाटण तालुक्‍यात ग्रामपंचायत निवडणुकीत देसाई-पाटणकर गटांना संमिश्र यश मिळाले आहे. विहे ग्रामपंचायतीत सत्तांतर करीत राष्ट्रवादीने बाजी मारली. तर चुरशीच्या झालेल्या चाफळ ग्रामपंचायतीत देसाई गटाला निसटता विजय मिळाला आहे. एकूण चार ग्रामपंचायतीपैकी राष्ट्रवादी कॉंग्रेस दोन तर शिवसेनेला दोन ग्रामपंचायती मिळाल्या आहेत.
तालुक्‍यात चाफळ, विहे, पाबळवाडी, डाकेवाडी या चार ग्रामपंचायतीचा सोमवारी निकाल जाहीर झाला. देसाई गटाचा बाल्लेकिल्ला असणाऱ्या विहे ग्रामपंचायतीत सत्तांतर करण्यात राष्ट्रवादीला यश मिळाले. काही दिवसापूर्वीच अंतर्गत वादातून देसाई गटात फूट पडली होती. विद्यमान सरपंच यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता त्याचा परिणाम या ग्रामपंचायतीच्या निकालावर स्पष्ट दिसून आला.

या निवडणुकीत सरपंचपदासह राष्ट्रवादीने 7 जागांवर विजय मिळवला. तर देसाई गटाचे उमेदवार अंजना संकपाळ या राष्ट्रवादीने पुरस्कृत केल्याने या जागेवर राष्ट्रवादीने दावा सांगितला आहे. त्यामुळे या ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदासह राष्ट्रवादी 8, शिवसेना 3 जागांवर विजय मिळाला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सरपंच दिनकर कुंभार हे विजयी झाले. तर आनंदा कुंभार, अंजना संकपाळ राष्ट्रवादी पुरस्कृत विनय लिंबारे, मंगल कुंभार, शैलजा मोरे, अविनाश पाटील, विक्रमसिंह पाटील, सुमन पाटील हे राष्ट्रवादीचे 8 सदस्य निवडून आले. तर देसाई गटाचे सूवर्णा संकपाळ, नितीन पाटील, रोहानबी मुल्ला हे निवडून आले.

डाकेवाडी ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळाले असून रेश्‍मा अनिल डाकवे यांची सरपंचपदी वर्णी लागली आहे. तर शरद शामराव डाकवे, माया साळुंखे, तुकाराम डाकवे, सारिका डाकवे या चार जागा राष्ट्रवादीला मिळाल्या. तर सिताबाई डाकवे ही एक जागा देसाई गटाला मिळाली आहे. अनिल डाकवे एक जागा बिनविरोध निवडून आली आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीने बहुमत मिळविले आहे.

संपूर्ण तालुक्‍याचे लक्ष लागून राहिलेल्या चाफळ ग्रामपचांयतीच्या निवडणूकीत देसाई गटाला निसटता विजय मिळाला आहे. देसाई गटाचे सरपंचपदाचे उमेदवार सूर्यकांत कुंडलीक पाटील हे केवळ दोन मतांनी विजयी झाले. देसाई गटाचे भारती गुजर, सुरेश काटे, सुनिता कुंभार, संगिता पाटील हे उमेदवार तर राष्ट्रवादीचे अर्जून कुरणे, प्रसाद ढेबे, राणी चव्हाण, तुषार पवार हे उमेदवार निवडून आले. या निवडणुकीत देसाई गटाने सत्ता अबाधित ठेवली आहे.

पाबळवाडी ग्रामपंचायतीत देसाई गटाची सत्ता अबाधित राहिली आहे. याठिकाणी देसाई गटाचे किरण सूर्यवंशी यांची सरपंचपदी वर्णी लागली आहे. विशाल सूर्यवंशी व राजश्री सूर्यवंशी हे दोन उमेदवार बिनविरोध तर संपत सूर्यवंशी, सुरेखा साळुंखे हे दोन सदस्य निवडून आले. राष्ट्रवादीचे मंगल पाबळे या बिनविरोध निवडून आल्या. तर उमेदवार न मिळाल्याने ओबीसीच्या दोन जागा रिक्‍त राहिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)