नदीपात्रातील खांबांच्या फाउंडेशनचे काम पूर्ण

-खांबांचे काम ऑक्‍टोबरपर्यंत पूर्ण होणार
– त्यानंतरच गर्डरद्वारे स्पॅन लॉचिंग केले जाणार
– 1.7 किलो मीटर मेट्रो मार्गात 59 खांब
 
पुणे  – महामेट्रोकडून पावसाळ्यापूर्वीच नदीपात्रातील मेट्रोच्या सर्व खांबांचे फाउंडेशनचे काम पूर्ण केले आहे. नदीपात्रातील सुमारे 1.7 किलो मीटरच्या मेट्रो मार्गात सुमारे 59 खांब आहेत. दरम्यान, खांबांचे फाउंडेशन पूर्ण झालेले असले तरी, मेट्रोकडून या खांबांचे काम ऑक्‍टोबरपर्यंत पूर्ण केले जाणार असून त्यानंतरच या ठिकाणी गर्डरद्वारे स्पॅन लॉचिंग केले जाणार असल्याची माहिती महामेट्रोकडून देण्यात आली.

वनाज ते धान्य गोदाम या मार्गातील सुमारे 1.7 किलो मीटरचा मार्ग हा कर्वे रस्त्यावरील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक ते कॉंग्रेस भवनच्या समोरपर्यंत नदीपात्रातून जातो. यात मेट्रोची डेक्‍कन आणि बालगंधर्व ही 2 स्थानकेही आहेत. या सर्व मार्गासाठी सुमारे 59 खांब नदीपात्रात येणार आहेत. या खांबांचे काम मागील वर्षी सुरू करण्यात आले होते. मात्र, पावसाळ्यात नदीपात्रात गाळ असल्याने सुमारे 3 महीने काम बंद होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पावसाळा संपताच महामेट्रोने गेल्या चार महिन्यांत वेगाने काम पूर्ण केले असून या मार्गातील 58 खांबांच्या फाउंडेशनचे काम पूर्ण झाले होते. तर लकडी पुलाजवळ असलेल्या एका खांबाचा पाया खोदताना रस्ता खचल्याने हे काम महामेट्रोने मागे ठेवले होते. हे काम दोन आठवड्यापूर्वी रस्ता बंद करून हाती घेण्यात येणार होते. मात्र, त्यामुळे वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन महामेट्रोकडून रस्ता बंद न करता रात्रीच्या वेळेत हे काम पूर्ण केले असल्याचे या मार्गाचे प्रकल्प व्यवस्थापक अतुल गाडगीळ यांनी सांगितले.

गर्डर लॉंचिंग पावसाळ्यानंतरच

या मार्गात असलेल्या खांबांच्या पूर्ण उभारणीवर महामेट्रोकडून पुढील सहा महिन्यांत भर दिला जाणार असल्याचे गाडगीळ यांनी स्पष्ट केले. पावसाळ्यात नदीपात्रात चिखल असल्याने काम करता येत नाही. त्यामुळे खांबाचे काम पूर्ण झाले तरी त्यावर दोन खांब जोडणारे स्पॅन बसविण्यासाठी आवश्‍यक असलेले गर्डर उभारणे आणि त्याद्वारे स्पॅन जोडणे शक्‍य नसल्याने हे काम पावसाळ्यानंतरच केले जाणार असल्याचे गाडगीळ यांनी स्पष्ट केले. तसेच, कर्वे रस्त्यावरून हा मार्ग जिथे नदीपात्रात येतो. त्या ठिकाणी कर्वे रस्त्यावरील पदपथावर एक खांब उभारला जाणार असून त्याचे कामही हाती घेण्यात आल्याचे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)