गाठी-निरगाठी

सकाळी सकाळीच आज आईशी फोनवर बोलणे झाले का कुणास ठाऊक आईचा आवाज थकल्यासारखा वाटला. आई, तुला बरे वाटत नाहीये का? मी विचारले, नाही ग विशेष नाही असे आई म्हणाली खरी पण बोलता बोलताच तिला ढास लागली. मग मात्र मला आईला स्वतःच जाऊन पहावेसे वाटू लागले. त्याप्रमाणे ह्यांच्या कानावर घातले. तेही म्हणाले पाऊसपाण्याचे दिवस आहेत. लहानगीला घेऊन एकटी जाऊ नको पण का कुणास ठाऊक मला राहवेच ना! म्हटले दोन तासाचा तर प्रवास. एखादी रात्र राहून उद्या परत निघेन, छोटीचे सगळे सामान भरले आणि एस.टी.त बसलेसुद्धा.

उतरले तेव्हा मात्र खरंच धुआंधार पावसाला सुरुवात झाली होती. जागोजागी पाणीही साठले होते. रिक्षाही थांबत नव्हत्या. छोटी अनुष्काही घाबरून मला चिकटून बसली होती. बेचैन अवस्थेत उभी असताना एक रिक्षावाला म्हणाला, बसा ताई रिक्षात. या बाळाला घेऊन कुठे थांबताय या पावसात! मी पटकन रिक्षात बसले. खरंच खूप ठिकाणी पाणी साचले होते. पण रिक्षावाल्या दादांनी अगदी सांभाळून मला घरी सोडले. मला रिक्षातून उतरलेले पाहून आईलाच खूप आश्चर्य वाटले. ती म्हणाली, अगं आत ये त्या रिक्षावाल्यादादांनाही बोलव आधी थोडा गरम गरम चहा घे! एवढ्या पाण्यात कोणी रिक्षा घालायलाही तयार होत नाही. यांनी तुला अगदी भावासारखे सांभाळून आणले हो कुठल्यातरी ऋणानुबंधाच्या गाठी असतात ह्या.

-Ads-

खरंच कुठल्या जन्मीचे असतात हे ऋणानुबंध की काही माणसे आपली काही ओळख नसतानाही आपल्यासाठी काहीतरी काम करून जातात. काही नात्यातल्या रेशीमगाठीही अशाच असतात. विशेषतः आई आणि मुलांच्या नात्यातील. मुलांसाठी कितीही कष्ट पडले तरी आईला ते जाणवतच नाहीत. या रेशीमगाठीत तिला बळ देतात.

लग्नाच्या समारंभात आपल्याकडे एक महत्त्वाचा विधी असतो. तो म्हणजे नवरीच्या अंगावरच्या शेलारीची नवरदेवाच्या शेल्याशी गाठ मारली जाते आणि ही तर जन्माची गाठ मानली जाते. दोघे मिळून एक नवं जग निर्माण करतात. एकमेकांच्या सुख-दुःखात साथ देतात. अडचणीच्या वेळी दोघे मिळून त्याचा सामना करतात तर आयुष्यातील आनंदही जोडीने लुटण्यात मोठे सुख असते. समाधान असते, ते अनुभवतात. आयुष्याचे बरेचसे टप्पे ओलांडले की आपोआपच परमेश्वराप्रती ओढ निर्माण होते. पण ते सुद्धा तुमच्या गाठीला काही सुकृत असेल तरच!

बहुत सुकृताशी जोडी म्हणून विठ्ठली आवडी

असे म्हटले आहे. त्यासाठी काहीतरी पुण्य गाठीला हवे. काहीतरी सुकृत हातातून घडायला हवे. असे असेल तरच चांगल्या घरात जन्म मिळतो, रूप, बुद्धीमत्ता, कलागुण देऊन ईश्वनरही तुम्ही केलेल्या चांगल्या कामाची दखल घेतो. म्हणूनच नेहमी चांगले वागा, कुणाचेही दोष न पाहता त्याच्यातील गुण पहा. अडल्यानडल्या लोकांना मदत करा व पुण्य गाठीशी जोडा असाच सद्विचार सर्व संतांनी आपल्याला सांगितला आहे.

आपण स्वतः कितीही चांगले वागलो तरी समाजात, नात्यात वागताना काही गैरसमज निर्माण होतात. हे गैरसमज वेळीच दूर केले नाहीत तर गैरसमजाच्या निगाठी तयार होतात. हलक्याे हाताने प्रसंगी स्वतःकडे कमीपणा घेऊन त्या लगेचच सोडवाव्या लागतात. नाहीतर कित्येक वर्षांची प्रेमाची नाती क्षणात तुटून जातात.

आजकाल तर एकमेकांच्यात संवाद कमी झाल्यामुळे अशा निरगाठी फार चटकन तयार होतात. एखादी व्यक्ती आपल्याशी अशी बोलली, अशी वागली म्हणजे तिच्या मनात माझ्याबद्दल वाईटच विचार असतील असा एकांगी विचार करू नका. कदाचित तसे नसेलही असा Second thought नक्कीच स्वतःला द्या आणि त्या व्यक्तीशी पुन्हा पहिल्यासारखेच हसून खेळून वागायचा प्रयत्न करा म्हणजे गैरसमजातून तयार होणाऱ्या निरगाठी नक्कीच सुटायला मदत होईल.

आपण एकदा दुसऱ्याच्या जागी आपण स्वतः आहोत असी कल्पना केली की दुसऱ्याच्या मनातील आपल्याला चटकन समजते. ती व्यक्ती अशी का वागली असेल हेही उमगते. आपण त्याजागी असतो तर असेच किंवा याहीपेक्षा वाईट वागलो असतो असे आपले आपल्याला पटले की त्या व्यक्तीचा राग मुळी येतच नाही. मग मैत्रिणींनो सगळ्यांशी प्रेमाने वागून या गैरसमाजाच्या निरगाठी लवकर सोडविणार ना?

– सुप्रिया साठे

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)