रामराजेंवरील टीका केवळ प्रसिद्धीसाठीच

विश्‍वजितराजे नाईक निंबाळकर यांचा आ. जयकुमार गोरेंवर आरोप

फलटण – माणचे आमदार जयकुमार गोरे हे नुसते प्रसिद्धीसाठी हापापलेले असून रामराजे यांच्यावर टीका केली की त्यांना प्रसिद्धी मिळते. रामराजे यांच्यावर टीका करण्याची जयकुमार गोरे यांची पात्रता नसून ते माण तालुक्‍यातील गावगुंड असल्याचा आरोप करत जनता त्यांना कधीच महत्व देणार नाही, असा टोला पंचायत समितीचे सदस्य व युवा नेते विश्‍वजितराजे नाईक निंबाळकर यांनी लगावला.

विश्‍वजितराजे म्हणाले, जयकुमार गोरे यांनी माण तालुक्‍यामध्ये किती व कोणते तिर मारले आहेत हे सर्व जनतेला ज्ञात आहे. त्यांच्या मतदारसंघात कसलाही विकास झाला नाही. त्याच्या उलट रामराजे यांच्या नेतृत्वाखाली फलटण मतदारसंघात भरघोस विकास झाला असून पूर्वी शिरवळवरून फलटणला येताना ओसाड राने पडून होती आता त्या ठिकाणी वेगवेगळ्या मोठ्या कंपन्या दिमाखात सुरू आहेत. या कंपन्यांमुळे हजारो युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. फलटण तालुक्‍याबद्दल कोणीही कितीही टीका केली तरी हे सर्वांना ज्ञात आहे की फलटण व खंडाळा हे तालुके रामराजे यांच्यामुळेच ओलिताखाली आले आहेत. अशी अनेक विकासकामे रामराजे यांच्या नेतृत्वाखाली झाली आहेत.

जयकुमार गोरे यांच्यात हिम्मत असेल तर फलटण व माण तालुक्‍याच्या विकासाची तुलना करावी. या मतदारसंघाची तुलना होवू शकत नाही हे उभ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. रामराजे यांनी केलेली विकासकामे सांगायची झाली तर पुढील काही दिवसाचे अंक पुरणार नाहीत. घाट उतरून दुसऱ्याच्या घरात लक्ष देण्यापेक्षा आपल्या मतदारसंघात लक्ष दिले तर त्यांनाच बरे होईल.

माण तालुक्‍यातील शिक्षित उद्योगपती जयकुमार गोरे यांना घाबरत असून माण मधील सुशिक्षित नागरिकांनी पुण्यामुंबईची वाट धरली आहे. जयकुमार गोरे यांना जनतेशी काही देणेघेणे नसून केवळ प्रसिद्धीसाठी रामराजे यांच्यावर टीका करत असल्याचे विश्‍वजितराजे यांनी स्पष्ट केले. निवडणूक जवळ आल्याने पाण्याचा मुद्दा उपस्थित करून मते मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्य जयकुमार गोरे करत असून यावेळी माण तालुक्‍यातील जनता त्यांच्या भुलथापांना बळी पडणार नाही, असेही विश्‍वजितराजे यांनी स्पष्ट केले.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)