आ. जयकुमार गोरेंचा धुळे मतदारसंघात प्रचार

प्रदेशाध्यक्षांसमवेत साईबाबांचे घेतले दर्शन; जिल्ह्यात चर्चांना उधाण

सातारा –
माढा लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात भूमिका घेतल्यानंतर आ.जयकुमार गोरे नुकतेच धुळे लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारात सहभागी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. कॉंग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ मालेगाव येथे काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये आ. गोरे सहभागी झाल्याचे दिसून आले. त्याचबरोबर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या समवेत आ.गोरे यांनी शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन देखील घेतले असल्याची छायाचित्रे त्यांच्या सोशल मिडीया अकाऊंटवर प्रसिध्द करण्यात आली आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघात आपल्या विचारांचा उमेदवार उतरविण्याच्या दृष्टीने आ.गोरे यांनी मागील सहा महिन्यापासून सुरूवात केली होती. त्यासाठी त्यांनी सर्वप्रथम टेंभुर्णी जि.सोलापूर येथे संजय शिंदे व रणजितसिंह ना.निंबाळकरांना एकत्रित करून बैठक घेतली. दरम्यान, माढ्यातून खुद्द खा.शरद पवार लढणार असल्याची कुणकुण लागल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा बोराटवाडी ता.माण येथे एकत्रित बैठक आयोजित केली. बैठकीसह मतदारसंघातील स्थितीचा आढावा घेतल्यानंतर पवारांनी माढ्यातून माघार घेतली. त्यानंतर घडामोडींना वेग आला.

कालपर्यंत बैठकीला एकत्रित उपस्थित असणारे संजय शिंदेंनी राष्ट्रवादीची तर रणजितसिंह ना.निंबाळकर यांनी भाजपची उमेदवारी स्विकारली. त्यामुळे स्वाभाविकच आ.गोरे काय भूमिका घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागून होत्या. अखेर आ.गोरे यांनी कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित केला अन कोणाच्या पाठीशी उभे रहायचे, अशी विचारणा केली. स्वाभाविकपणे कार्यकर्त्यांनी रणजितसिंह ना.निंबाळकर यांच्या पारड्यात माप टाकले. आ.गोरेंनी नियोजनबध्द भूमिका घेतल्यानंतर पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष होते. परंतु उलट आ.गोरे व आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या बैठका झाल्या. तर आ.चव्हाण यांनी रणजितसिंह ना.निंबाळकर यांचा भाजपप्रवेशाचा निर्णय र्दुदैवी असल्याची मोजकी प्रतिक्रिया व्यक्त केली. तद्‌नंतर आ.गोरे माढा आणि सातारा दोन्ही मतदारसंघातील प्रचारात सहभागी झाले नाहीत. मात्र, शुक्रवारी ते प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या समवेत शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेताना आणि धुळे मतदारसंघात कॉंग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करताना दिसून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)