प्रेरणा : जबाबदार जिल्हाधिकारी

-दत्तात्रय आंबुलकर

जिल्हाधिकाऱ्यांवर आपल्या जिल्ह्याच्या विकासाची मोठी जबाबदारी असते. आपल्या कार्यक्षेत्रातल्या समस्या जाणून घेऊन त्यांची सोडवणूक करण्यासाठी त्यांना काम करावे लागते. काही जिल्हाधिकारी ही जबाबदारी आपुलकीच्या भावनेने व प्रयत्नपूर्वक पार पाडतात. त्यापैकीच एक म्हणजे श्‍वेता मोहंती. तेलंगणातल्या मागास समजल्या जाणाऱ्या “वनपार्थी’ जिल्ह्यात विविध शासकीय उपक्रम जिद्दीने व यशस्वीपणे राबविणाऱ्या श्‍वेता मोहंती यांचेमुळे तिथे विकासगंगाच अवतरली असून त्याचीच ही यशोगाथा-

तेलंगणातल्या दुर्गम आणि मागास अशा वनपार्थी या दुर्लक्षित जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून नेमणूक झाल्यावर त्यांनी जनतेसाठी विविध विकासकामांना आणि उपक्रमांना सुरुवात केली. गरिबीने ग्रासलेल्या या जिल्ह्यात अनेक समस्या होत्या. त्यावर उपाययोजना म्हणून श्‍वेता मोहंती यांनी सुरुवातीला तातडीने सोडविण्यायोग्य समस्यांवर लक्ष केंद्रित केले. त्यातही महिलांचे आरोग्यविषयक प्रश्‍न सोडविण्यावर त्यांनी भर दिला. महिलांमध्ये तीव्र स्वरुपाचा अनिमिया, मासिक स्वच्छता इत्यादींवर त्यांनी महिलांमध्ये जागृती निर्माण केली.

स्थानिक महिला आणि विद्यार्थ्यांचे आयुष्य सुखकर होण्यासाठी श्‍वेता मोहंती यांनी बरेच उपक्रम राबविले. जिल्ह्याच्या सामाजिक व आर्थिक विकासात त्यांनी मोठा वाटा उचलला. महिला बचतगटांच्या स्थापनेला प्रोत्साहन दिले. गरोदरपणी महिलांमध्ये अनिमियाचे प्रमाण सुमारे 40% असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी अशा महिलांना सरकारी रुग्णालयात उपचार देण्याच्या जोडीलाच शाळकरी मुलींपासून गृहिणींपर्यंत सर्वांमध्ये जागृती निर्माण केली व त्याचे सकारात्मक परिणाम पण दिसून आले.

वनपार्थी जिल्ह्यातील आठ हजार शाळकरी मुलींची रक्‍ततपासणी व आरोग्य तपासणी करण्यासोबतच त्या वयोगटातील मुलींमध्ये होणारे बदल व वैज्ञानिक-वैद्यकीय स्वरूपाचे ज्ञान देऊन मुलींच्या व्याधी-समस्यांची मोठ्या प्रमाणात सोडवणूक केली. त्यांना याकामी स्थानिक शिक्षिका-महिलांचा पण चांगला प्रतिसाद लाभला. सेवाभावी संस्थांच्या व डॉक्‍टरांच्या सहकार्याने जिल्ह्यातील मुलींना लोहमात्र औषध स्वरुपात उपलब्ध करून दिल्याने जिल्ह्यातील मुली आणि युवतींच्या आरोग्यात लक्षणीय सुधारणा झाली.

याशिवाय जिल्हाधिकारी म्हणून श्‍वेता मोहंती यांनी जिल्ह्यातील शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींना अद्ययावत शैक्षणिक सोयी-सुविधा देण्यावर विशे, भर दिला. त्यांनी विशेष प्रयत्नांद्वारे शालेय शिक्षणासह संगणकाचे ज्ञान पण आवर्जून दिले. यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व विशेष विकास झाला.

जिल्ह्यातील जनसामान्यांमध्ये बहुसंख्य असणाऱ्या शेतकऱ्यांची कृषीसह आर्थिक उन्नती साधण्यासाठी श्‍वेता मोहंती यांनी जिल्ह्यातील हवामान व वातावरण हे शेंगदाणा उत्पादनाला अधिक पोषक असल्याने तज्ज्ञांकरवी शेंगदाणा उत्पादक शेतकऱ्यांना विशेष मार्गदर्शन केले. याला शेतकऱ्यांचा पण चांगला आणि सकारात्मक परिणाम झाला. त्यांनी सेंद्रीय व शास्त्रोक्‍त पद्धतीने उत्पादक शेंगदाण्याची शेती मोठ्या प्रमाणात तर केलीच व आज त्या परिसरातून शेंगदाण्याची निर्यात होऊ लागल्याने शेतकऱ्यांसह साऱ्या समाजाचेच जीवनमान उंचावले आहे. आर्थिक समृद्धी शेतकऱ्यांच्या शेतापासून दारापर्यंत पोहोचली आहे.

शासकीय चाकोरीत काम करतानाच प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी असणारी व्यक्‍ती काय करू शकते याचा वस्तुपाठच तेलंगणच्या श्‍वेता मोहंती या महिला जिल्हाधिकाऱ्यांनी कृतिशील वस्तूपाठ घालून दिला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)