तलावांच्या कामासाठी काळेंचे आंदोलन सुरूच

काम सुरू होत नाही तोपर्यंत माघार नसल्याचा केला निर्धार

कोपरगाव – कोपरगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार व पाच नंबर साठवण तलावाचे काम त्वरित सुरू करावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते आशुतोष काळे यांनी सोमवारपासून आंदोलन सुरू केले आहे. आज उपोषणाचा दुसरा दिवस होता. याबाबत काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याबाबत सोमवारी शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्या उपस्थितीत तहसीलदार योगेश चंद्रे यांनी तलावाच्या कामाबाबत तहसील कार्यालयात बैठक घेतली.

यावेळी काम कधी सुरू करणार, असा सवाल काळे यांनी अधिकाऱ्यांना केला. बैठकीला आ. स्नेहलता कोल्हे, काळे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार योगेश चंद्रे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे आदी उपस्थित होते. या बैठकीत कोपरगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 4 व 5 क्रमांकाच्या साठवण तलावाचे काम त्वरित सुरू करण्यासाठी चर्चा करण्यापेक्षा तालुक्‍याच्या आमदार व नगराध्यक्ष यांनी मुख्य विषयाला बगल देत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू केले. त्यामुळे काळे यांनी आक्रमक पवित्रा घेत आजपर्यंत चार नंबर साठवण तलावाचे विस्तारीकरणाचे व नवीन पाच नंबर साठवण तलावाचे काम का सुरू होऊ शकले नाही.

तुम्ही आजपर्यंत काय केले, हे सांगू नका, त्यापेक्षा साठवण तलाव कधी होणार, हे सांगा असे खडे बोल सुनावले. मात्र उपस्थितांपैकी कोणीही साठवण तलावाचे काम कधी सुरु करणार याबाबत ठोस आश्वासन देऊ न शकल्यामुळे काळे धडक कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर धरणे आंदोलनाला जावून बसले.

दुपारी आंदोलनस्थळी प्रांताधिकारी रमेश शिंदे, तहसीलदार योगेश चंद्रे, नगराध्यक्ष विजयर वहाडणे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे तसेच व गायत्री कन्स्ट्रक्‍शनचे प्रतिनिधींनी काळे यांची भेट घेऊन काम सुरू करण्याचे आश्वासन दिले. काळे यांनी पुन्हा आक्रमक होत आम्ही आता कोणत्याही आश्वासनांना बळी पडणार नाही, असे सांगितले. हे काम करण्यास ठेकेदार कंपनी टाळाटाळ करत असल्याने कोपरगाव शहरातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे तातडीने साठवण तलावाचे काम सुरु करावे, अशी आग्रही मागणी लावून धरली. आज आंदोलनाचा दुसरा दिवस होता.

माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे, विजयराव आढाव, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगुले, शहर युवक अध्यक्ष नवाज कुरेशी, चारुदत्त सिनगर, नगरसेवक गटनेते वीरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, प्रतिभा शिलेदार, वर्षा कहार, माधवी वाकचौरे, मायादेवी खरे, सुनिल शिलेदार, अजीज शेख, कृष्णा आढाव, संतोष चवंडके, रावसाहेब साठे, सचिन परदेशी, संदीप कपिले, वाल्मीक लाहिरे, राहुल देवळालीकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)