ठंडा ठंडा कुल कुल, पण जरा जपून

वापरण्यात येणाऱ्या बर्फावर अन्न औषध प्रशासनाचे लक्ष
गुरूनाथ जाधव

सातारा – सातारा शहरातील कडक उन्हामुळे तर दुसरीकडे निवडणुकांच्या रणधुमाळीमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. यामध्ये तप्त उन्हात शित पेये, तसेच बर्फाचे पदार्थ खाण्यासाठी सर्वत्र नागरिकांची गर्दी होत आहे. या तप्त वातावरणात क्षणभर आनंदासाठी आरोग्याची हेळसांड होऊ नये यासाठी सातारा अन्न औषध प्रशासन सज्ज झाले आहे.
अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत नियम व नियमने 2011 च्या कलम 18, 29 व 30 नुसार अन्नपदार्थाची सुरक्षितता व त्यासंदर्भात जनतेचे आरोग्य अबाधित राखण्याची व त्यासाठी आवश्‍यक उपाययोजना करण्याची जबाबदारी राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त यांची आहे.

ज्या अन्न व्यवसायिकांकडून ग्राहकांना अन्नपदार्थ विक्री करताना त्यात वापरण्यात आलेला बर्फ किंवा थेट खाण्याच्या उपयोगासाठी विक्री होत असलेला बहुतांशी बर्फ असुरक्षित असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आले आहे. यामध्ये पिण्यायोग्य पाण्यापासून तयार करण्यात आलेल्या बर्फास खाद्य तर वापरण्यात येणाऱ्या पाण्यापासुन बनविण्यात येणाऱ्या बर्फास अखाद्य बर्फ असे म्हणात. खाद्य बर्फ हा अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार अन्न या परिभाषेत मोडतो.
महाराष्ट्र राज्यात बर्फाचे उत्पादन करताना उत्पादकांनी खाद्य दर्जाच्या बर्फात कुठलाही रंग टाकू नये व अखाद्य बर्फात अन्न सुरक्षा व मानके कायद्यात नमूद केलेला व खाद्योपयोगासाठी वापरण्यात येणारा रंग अत्यल्प प्रमाणात निळ्या रंगाची छटा निर्माण होईल एवढा किमान दहा पीपीएम खाद्यरंग टाकणे आवश्‍यक आहे. तसेच खाद्य बर्फ विक्री व खाद्य पदार्थात वापरण्यात येणारा बर्फ यामध्ये बर्फ उत्पादक साठा वितरण वाहतूक व विक्री यावर अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 नियम व नियमन 2011 तरतुदीनुसार कारवाई होईल व खाद्य बर्फाच्या उत्पादकांनी यामध्ये खाद्य रंगाचा वापर केला नाही तर सदरचा बर्फ खाद्य समजून त्याला अन्न सुरक्षा व मानके अधिनियमाच्या कार्यकक्षेत समजले जाईल असा आदेश निर्गमित केला आहे.

सातारा जिल्ह्यासह तापलेल्या वातावरणात ठंडा ठंडा कुल वाटावे म्हणून नागरिक, शित पेये, ऊसाचा रस, लस्सी, मठ्ठा अन्य पेयांसोबत, बर्फा पासुन किंवा बर्फ घातलेले अन्न पदार्थ मोठया प्रमाणावर खात असतात. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सातारा अन्न औषध प्रशासनाने अन्न सुरक्षा मानका नुसार तपासणी मोहीमा सुरू केल्या आहेत.

सातारा जिल्ह्यात बर्फ तसेच बर्फापासून बनविण्यात येणाऱ्या अन्न पदार्थाची विक्री साठवणूक मोठ्या प्रमाणावर केली जाते. यामध्ये नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील बर्फ निर्मिती करणारे 9 कारखाने, तसेच 16 पाणी पॅकेजिंग प्लॅन्टची तपासणी सातारा जिल्हा अन्न औषध प्रशासनाने सुरू केली आहे. यामध्ये व्यावसायिकांनी अन्न औषध प्रशासनाचे अधिकृत परवाना असलेल्या बर्फ निर्मात्याकडूनच बर्फ खरेदी करणे आवश्‍यक आहे. तसेच याबाबत नागरिकांना कुठेही गैरप्रकार आढळल्यास तातडीने अन्न औषध प्रशासनास कळवण्याचे आवाहन केले आहे.
– शिवकुमार कोडगिरे, सहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासन सातारा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)