कोयनेची वीजनिर्मिती उद्यापासून बंद

राज्यापुढे भारनियमनाचे संकट; दुष्काळाचीही गडद छाया

कोयना धरणात आज तारखेला 16.51 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. पश्‍चिमेकडील महाजनकोचा कोटा केवळ 3.83 टीएमसी एवढा शिल्लक आहे. तर पूर्वेकडील सिंचनासाठी लागणारे 7.55 टीएमसी पाणी शिल्लक आहे.

सूर्यकांत पाटणकर

पाटण  – राज्यापुढील दुष्काळाचे सावट गडद असताना आता नव्याने वीजनिमिर्तीचे संकट उभे राहिले आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना जलविद्युत प्रकल्पातून एक जून पासून पूर्णपणे वीजनिर्मिती बंद करण्याच्या सूचना सातारा सिंचन मंडळाने दिल्या आहेत. कोयना धरणात पुरेसा पाणीसाठा नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

राज्यात यावर्षी तीव्र दुष्काळाची परिस्थिती आहे. त्यामुळे कोयना धरणातून पाण्याची मागणी वाढू लागली आहे. पूर्वेकडील पाण्याचा वापर करून पायथा वीज गृहातून वीजनिर्मिती करून कोयना नदीपात्रात पाणी सोडण्यात येते. मात्र पश्‍चिमेकडील वीजनिर्मिती करणाऱ्या महाजनकोचा कोटा संपल्याने सातारा सिंचन मंडळाने वीजनिमिर्ती बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

1 जून ते 30 मे असे जल वर्षे असणाऱ्या कोयना प्रकल्पाला वीजनिमिर्ती व सिंचनाचे नियोजन करावे लागते. यावर्षी चाळीस टीएमसी पेक्षा जास्त पाण्याचा वापर पूर्वेकडील सिंचनासाठी करण्यात आला आहे. तर पश्‍चिमेकडील वीजनिर्मितीसाठी 67.50 टीएमसी पाण्याचा वापर केल्याने धरणात निर्धारित पाणीसाठा ठेवण्यासाठी पश्‍चिमेकडील वीजनिमिर्ती बंद करण्यात येणार आहे. कोयना प्रकल्पातील बंद होणाऱ्या वीज निर्मितीमुळे राज्यापुढील दुष्काळाबरोबरच भारनियमनाचे संकट वाढणार आहे.

कोयना वीजनिमिर्ती प्रकल्पातून निर्माण होणारी वीज टप्प्या टप्प्याने बंद करण्यात येणार आहे. कोयना धरणात पाणी शिल्लक नसल्याने तसेच आणीबाणी वेळी 0.5 टीएमसी पाणीसाठा शिल्लक ठेवण्यात येणार आहे. तर पश्‍चिमेकडील गावेही पाण्याची मागणी करतात. तर टर्बाइनलाही काही प्रमाणात पाणी आवश्‍यक असते. या सर्व नियोजनासाठी कोयना वीज प्रकल्पातून निर्माण होणारी वीजनिमिर्ती टप्प्या टप्प्याने बंद करण्यात येणार आहे. तसे पत्र कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले आहे.

वैशाली नारकर, अधीक्षक अभियंता, सिंचन मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)