सोलापूर – कांदा निर्यातीसाठी सरकारकडून दिले जाणारे दोन रुपये प्रति किलो दराने अनुदान बंद केल्यानंतर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापाऱ्यांनी कांद्याचे दर पाडले आहेत.बुधवारी प्रति किलो 16 ते 18 रुपये विकला जाणारा कांदा आज 13 ते 15 रुपये प्रति किलो दराने विकला गेला आहे.
वास्तविक पाहता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी कांदा विक्रीसाठी आणतात तो कांदा निर्यातीसाठी जाणारा कांदा नसतो. काही प्रमाणात जरी हा कांदा निर्यात होणार असला तरी व्यापाऱ्यांनी मात्र सरसकट कांद्याचे दर पाडले आहेत.
कांद्याला निर्यात प्रोत्साहन म्हणून दिले जाणारे दोन रुपयांचे अनुदान सरकारने बंद केल्यानंतर हा फटका कांदा उत्पादक सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मालाला सरकारने निर्यात प्रोत्साहन अनुदान बंद केल्यानंतर गुरुवारी सोलापुरातील व्यापाऱ्यांनी दोन ते तीन रुपये प्रति किलो दर पाडल्याचे चित्र पाहायला मिळाले.