केंद्राच्या निर्णयाच्या विरोधात ईशान्य भारतात बंद; अनेक ठिकाणी हिंसक प्रकार

गुवाहाटी: केंद्र सरकारने संसदेत जे सिटीझन्स ऍमेंडमेंट विधेयक आणले आहे त्याच्या विरोधात ईशान्य भारतातील अनेक संघटनांनी एकत्र येऊन अकरा तासांचा बंद पुकारला आहे. बंदच्या काळात अनेक ठिकाणी निदर्शने, जाळपोळ असे प्रकार घडले आहेत. ऑल आसाम स्टुडंट्‌स युनियन आणि भाजप प्रणित एनडीए मधून बाहेर पडलेल्या आसाम गणसंग्राम परिषदेने आसामात बंदचे आयोजन केले आहे. त्याला अन्य संघटना आणि पक्षांनीही पाठिंबा दिला आहे.

आसाममध्ये बंदच्या काळात अनेक ठिकाणी निदर्शकांनी रस्तेवाहतूक रोखून धरली. त्यामुळे गुवाहाटी, तिनसुखीया आणि दिब्रुगड या जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती. गुवाहाटी आणि दिब्रुगड जिल्ह्यात काही ठिकाणी काहीं काळापुरती रेल्वे वाहतूकही रोखून धरण्यात आली होती. आसामात बंदचा मोठा प्रभाव दिसून आला. शैक्षणिक संस्था आणि दुकानेही बंद होती. या बंदला सुमारे तीस संघटनांचा पाठिंबा असल्याने बंदचा मोठा प्रभाव झाल्याचे सांगण्यात येते. बंदच्या संबंधात अनेक ठिकाणी जादा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

केंद्र सरकारने मांडलेल्या या विधेयकात अफगाणिस्तान, बांगलादेश, आणि पाकिस्तानातून भारतात आलेल्या हिंदु, बौद्ध, शिख अशा अल्पसंख्याक नागरीकांना कायम स्वरूपी नागरीकत्व देण्याची तरतूद आहे. यासाठी संबंधीत नागरीक भारतात 12 वर्ष वास्तव्याला असला पाहिजे अशी मुळ कायद्यात अट होती पण ती अट शिथिल करून वास्तव्याची अट 6 वर्ष इतकी करण्यात आली आहे. आसाम गण परिषद आणि ऑल आसाम स्टुडंट्‌स युनियन या संघटनांचा या कायद्यातील दुरूस्तीला विरोध आहे. ही विधेयक दुरूस्ती म्हणजे केंद्र सरकारने 1985 साली केलेल्या आसाम कराराचे उल्लंघन ठरणार आहे असे त्यांनी म्हटले आहे.

आसाम करारात विदेशातून आलेल्या सर्वांनाच बाहेर काढण्याची हमी सरकारने दिली आहे. पण आता मोदी सरकारने त्यात दुरूस्ती करून बिगर मुस्लिम अल्पसंख्याकांना भारतात राहण्याची अनुमती देण्याचा प्रयत्न चालवला आहे. मिझोराम, मणिपुर, नागलॅंड, त्रिपुरा, अरूणाचल प्रदेश या ईशान्येकडील अन्य राज्यांमधील विद्यार्थी संघटनांनी आणि अन्य राजकीय पक्षांनी बंदला पाठिंबा दर्शवला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)