बंद एटीएम वॉटर मशीनवरून खडाजंगी

सातारा पंचायत समिती सभा
स्टोन क्रशरला व्यावसायिक कर लागू करा : अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवर सदस्यांची नाराजी
सातारा – सातारा पंचायत समिती कार्यालयामध्ये कार्यान्वित करण्यात आलेले एटीएम वॉटर बंद स्थितीत का आहे? याचा खुलासा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने करावा, अशी मागणी पंचायत समिती सदस्य रामदास साळुंखे यांनी करताच, अधिकारी कशाला? आज मी अध्यक्ष आहे, मी माहिती देतो, असे उपसभापती जितेंद्र शिंदे यांनी सांगताच रामदास साळुंखे आणि जितेंद्र शिंदे यांच्यात जोरदार शब्दिक चकमक उडाली. राहुल शिंदे यांनी त्यामध्ये यशस्वी शिष्टाई केल्याने वाद टळला. दरम्यान, लिंबखिंड येथील स्टोन क्रेशर व्यावसायिकाना आजपर्यंत व्यवसाय कर आकारला जात नव्हता, तो त्यांना त्वरित आकारण्यात यावा, अशी सूचना जितेंद्र सावंत यांनी ग्रामपंचायत विभागाला केल्याने एकच खळबळ उडाली.

सातारा पंचायत समितीची मासिक सभा उपसभापती जितेंद्र सावंत यांच्या अध्यक्षतेखाली, गटविकास अधिकारी अमिता दगडे-पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी संजय ढमाळ यांच्या उपस्थितीमध्ये झाली. प्रारंभी पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहण्यात आली. कामकाजास प्रारंभ झाल्यानंतर रामदास साळुंखे यांनी पंचायत समितीमधील महिला सदस्यांना सेस फंडाचे वाटप समान व्हावे. त्याबाबत मी आयुक्तांना पत्र पाठवले असून वेळ पडल्यास न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले. त्यावर सावंत म्हणाले, सेस फंडाच्या निधीबाबत सभागृहामध्ये बहुमताने ठराव झाला आहे, त्यामुळे ठरावानुसार कार्यवाही करण्यात येईल. कृषी विभागाच्या आढाव्यात संजय घोरपडे यांनी आम्ही तक्रार केलेल्या बंधाऱ्यांची कामे पूर्ण कशी झाली, असा प्रश्‍न उपस्थित केला असता माहिती घेऊन सांगतो असे उत्तर संबंधित अधिकाऱ्यांनी दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बांधकाम विभागाचा आढाव्यामध्ये सातारा पंचायत समितीच्या आवारात पेवर ब्लॉक बसवण्यात येणार होते. त्याचे काय झाले अशी विचारणा केली असता जितेंद्र सावंत म्हणाले, सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर पीआरसी आली तेव्हा पंचायत समितीच्या आवारामध्ये रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. प्रवेशद्वाराची डागडुजी करण्यात आली. पीआरसी दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर पेव्हर ब्लॉक बसविणे रद्द करण्यात आले.

त्यानंतर साळुंखे यांनी पंचायत समितीच्या आवारात कार्यान्वित करण्यात आलेल्या वॉटर एटीएमचे पुढे काय झाले याची माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी द्यावी अशी मागणी केली. त्यावर आजच्या सभेचा अध्यक्ष मी आहे, मी माहिती देतो असे सांगत जितेंद्र शिंदे म्हणाले, वॉटर एटीएमसाठी 1 लाख 79 हजार रुपये खर्च आला. त्यामध्ये फिल्टर प्लांट, पाईपलाईन आणि टाकी याचा समावेश आहे. टाकी खड्ड्यात असल्यामुळे पाणी येत नाही. त्यावर साळुंखे म्हणाले, वॉटर एटीमचे टेंडर न काढता काम का केले? हे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला.

महावितरण विभागाच्या आढाव्यामध्ये रामदास साळुंखे यांनी जिल्हा परिषदेच्या सातारा तालुक्‍यातील शाळांना कमर्शियल वीज बिले दिली जात आहेत, ती कमर्शियल न देता रेग्युलर द्यावीत अशी मागणी केली, त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी शासनाने तशा सूचना केल्या असून त्यानुसार कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)