कराड आगाराकडून उंडाळेचे पास सेंटर बंद

विद्यार्थ्यांची गैरसोय; ऐन परीक्षेच्या कालावधीत घालाव्या लागताहेत कराडच्या वाऱ्या

कराड –
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी कराड दक्षिण विभागातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या उंडाळे ता. कराड येथे सुरू केलेले विद्यार्थी पास सेंटर अचानक बंद करून विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय केली आहे. यामुळे त्रस्त विद्यार्थी रास्ता रोको करण्याच्या तयारीत आहेत.

कराड दक्षिण विभागातील 100 पेक्षा जास्त वाड्या-वस्त्यावरून उंडाळे, कराड, सातारा, कोल्हापूर यासह इतर ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी ये-जा करतात. या विद्यार्थ्यांना पासाची गैरसोय असल्यामुळे या विभागातील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन उंडाळे येथे पास वितरण व्यवस्था सुरू करावी अशी मागणी केली होती यावर तब्बल दोन ते अडीच वर्षाच्या प्रयत्नानंतर ही मागणी मान्य झाली. गत शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला येथून पास वितरण करण्यास सुरूवात झाली. परंतु मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच कराड एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक येथील पास सेंटर बंद केले आहे. यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. पासासाठी कराडची वाऱ्या सुरू आहेत.

या सर्व प्रकारामुळे कराड येथे पासासाठी आपले शैक्षणिक काम सोडून विद्यार्थ्यांना जावे लागत आहे. विद्यार्थ्यांचा पैशाचा अपव्यय आणि वेळही वाया जात आहे. शिवाय गर्दीचा नाहक त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. ऐन परीक्षांच्या कालावधीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक विद्यार्थाची गैरसोय केली आहे. यामधून वरिष्ठांनी काय साधले असा संतप्त सवाल विचारला जात आहे.

या सेंटरमधून काले, धोंडेवाडी, नांदगाव, उंडाळे, टाळगाव, घोगाव, सवादे, येवती, साळशिरंबे, म्हासोली, तुळसण, नांदगाव, ओंडोशी, ओंड, शेवाळेवाडी, पाटीलवाडी, जिंती, ओंड, शेवाळेवाडी, पाटीलवाडी, जिंती, शेळकेवाडी, येळगाव, गोटेवाडी, भुरभूशी, धोंडेवाडी, भरेवाडी, काळगाव, धामणी, शेडगेवाडी, मेणी, येणपे यासह सातारा सांगली जिल्ह्यातील विद्यार्थी वर्गाची या सेंटरमुळे मोठी सोय झाली होती. पण कराड आगाराच्या वरिष्ठांच्या नाकर्तेपणामुळे ही पास सेवा बंद करण्यात आली. ही सेवा पुन्हा सुरू न केल्यास विद्यार्थी केव्हाही पूर्वसूचना न देता रास्ता रोको करतील याची जबाबदारी एसटी महामंडळाच्या आगारप्रमुख यासह वरिष्ठांची राहील, असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी सेनेचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष सागर जाधव यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)