आडोशी बोगद्याजवळ पुन्हा दरड कोसळली

“पायोनियर’चे दोन कर्मचारी जखमी
मुंबईकडे जाणारी वाहतूक दोन तास विस्कळीत
लोणावळा – मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई एक्‍सप्रेस वेवरील खंडाळा (बोरघाट) घाटातील आडोशी बोगद्याजवळ बुधवारी (दि. 10) सायंकाळी चारच्या सुमारास मोठी दरड कोसळली. या घटनेत पायोनियर कंपनीचे दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहे. चार दिवसांपूर्वीच रविवारी पहाटे सव्वापाच वाजण्याच्या सुमारास याच ठिकाणी मोठी दरड कोसळली होती.

या घटनेमुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक दोन तास विस्कळीत झाली होती. या दरडीच्या घटनेमुळे संरक्षक जाळ्या बसवून व उपाययोजना राबवून देखील एक्‍सप्रेस वे वरील दरड संकट अद्याप सुरूच असून, प्रवास सुरक्षित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील पाच दिवसांपासून लोणावळा-खंडाळ्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. बुधवारी दिवसभर लोणावळा व खंडाळ्यात पावसाची संततधार सुरू होती.

चार दिवसांपूर्वी खंडाळा (बोरघाट) घाटातील आडोशी बोगद्याजवळ किलोमीटर क्रमांक 41/500 येथे कोसळलेल्या दरडीच्या ठिकाणी उपाययोजना व सैल झालेल्या दरडी व मुरूम, माती हटविण्याचे काम पायोनियर कंपनीच्या वतीने सुरू होते. त्यानंतर दुपारी चारच्या सुमारास डोंगरावरून मोठी दरड कोसळली. या घटनेत याठिकाणी काम करणारे दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. या ठिकाणी उभ्या असलेल्या एका टेम्पोवर दरड कोसळून नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, आयआरबी कंपनीचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मार्गावर कोसळलेली दरड बाजूला सारून मुंबईकडे जाणारी वाहतूक दोन तासांच्या प्रयत्नानंतर पुन्हा पूर्ववत सुरू केली. दरड हटविण्याच्या कामा दरम्यान मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान वाहतूक जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वळविण्यात आली होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)