दहा महिन्यांचा कालावधी : देहू ग्रामपंचायत कार्यालयात झाली लिलावाची बोली
देहुरोड – श्री क्षेत्र देहू ग्रामपंचायतीच्या कार्यालयात मंगळवारी (दि. 28) वाहन प्रवेश आणि स्वच्छता कराचा लिलाव झाला. दहा महिन्यांसाठी झालेला हा लिलाव सहा लाख 37 हजार 500 रुपयांवरून सुरू झाला. खुला लिलाव सात लाख साठ हजार रुपयाच्या बोलीपर्यंत थांबला. सोमनाथ भागवत मुसूडगे यांनी घेतला. 1 जून ते 31 मार्च अखेरसाठी हा लिलाव देण्यात आला आहे.
देहू ग्रामपंचायत कार्यालयामध्ये वाहन प्रवेश कर व स्वच्छता कराचा लिलाव ग्रामविकास अधिकारी अर्जुन गुडसूरकर, सरपंच ज्योती टिळेकर, सदस्य दिपाली जम्बुकर, राणी मुसूडगे, हेमा मोरे, सचिन कुंभार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माऊली काळोखे, विश्वस्त संजय मोरे, विशाल मोरे, उमेश मोरे, प्रकाश काळोखे, राजेंद्र मोरे आदींच्या उपस्थितीत घेण्यात आला.
लिलावाची प्रक्रियेत सदाशिव महादेव मोरे, सोमनाथ भागवत मुसूडगे, दिलीप नारायण गोसावी यांनी भाग घेतला होता. लिलावाची प्रक्रिया बारा वाजता सुरू करण्यात आली. तत्पूर्वी लिलावात बोली बोलणाऱ्यांकडून प्रत्येकी दहा हजार रुपयांची अनामत रक्कम घेण्यात आली होती. लिलावानंतर लिलाव घेणाऱ्याची अनामत रक्कम ग्रामपंचायतीकडे जमा राहणार आहे. लिलाव न घेणाऱ्यांची एक हजार रुपये कमी करून बाकी रक्कम परत करण्यात आली. लिलावाची सुरुवात सहा लाख 37 हजार 500 रुपयांनी सुरुवात करण्यात आली. लिलाव वाढविताना पाच हजारांच्या पुढे बोली बोलण्यास बंधनकारक होते. त्यामुळे लिलाव अखेरीस सात लाख 60 हजार रुपयांच्या बोलीने मुसूङगे यांनी घेतला.
आठवडे बाजार आणि प्रतिदिन असणारे पथारीवाले, हातगाड्याचा स्वच्छता कर वसुलीचा 15 लाखांचा लिलाव मंगळवारी होणार होता. मात्र त्यासाठी कोणते निकष, नियम, अटी आहेत. हे ग्रामपंचायतीच्या सदस्यांनाच माहिती नसल्याने रद्द करण्यात आले. त्याबाबत मासिक बैठकीनंतर त्याचा विचार करण्यात येईल, असे सदस्या हेमा मोरे यांनी यावेळी सांगितले.