आगाशिव लेणी व परिसराची मुलांकडून स्वच्छता

नऊ पोती प्लॅस्टिक झाले गोळा; चिमुकल्या हातांनी बनवली पक्ष्यांसाठी घरटी
कराड – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बालसुधार व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आगाशिव येथील प्राचीन बौद्धकालीन लेण्या व परिसराची स्वच्छता करण्यात आली. यामध्ये नऊ पोती प्लस्टिक कचरा गोळा करण्यात आला. याच बरोबर पक्ष्यांसाठी घरटी व पाण्याची सोय करण्यात आली.

होलिका दहन म्हणजे जे काही वाईट आहे, त्याचा त्याग करून नव्या गोष्टींची सुरुवात करणे होय. त्यासाठी सर्वांच्या आरोग्याचा विचार करून आरोग्यास घातक गोष्टी नाहीशा करणे, यासाठी दोन्ही शाळांच्या मुलांनी सहभाग नोंदवून आगाशिव लेणी व परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. आगाशिव लेण्या केंद्र सरकारने संरक्षित ठिकाण म्हणून घोषित केले आहे.

पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळाल्यापासून या लेण्यांना भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप वाढली आहे. पर्यटकांची संख्या वाढल्यामुळे लेण्या व लेण्याच्या परिसरात प्लॅस्टिक पिशव्या, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, खाऊची पाकिंग कागदे यांचे प्रमाण वाढलेले दिसून येत होते. याच कचऱ्याचा परिणाम पावसाळ्यात दिसून येतो त्यामुळे पाण्याचा प्रवाह बदलणे, आरोग्याचे प्रश्न निर्माण होणे आदी बाबी गोष्टी होण्याची शक्‍यात गृहीत धरून मुलांनी परिसराची स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला. डोंगराच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात कचरा गोळा झाला. त्याची लेण्याच्या देखभालीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचारी यांच्या उपस्थित विल्हेवाट लावण्यात आली.

होलिकोत्सवाचे बदलते रूप नव्या पिढीला समजावे व परिसराच्या स्वच्छतेविषयी नागरिकांच्यात जागरूकता व्हावी, याकरिता परिसरातील एतिहसिक ठिकाणी राबविलेली ही मोहीम कौतुकास पात्र ठरली आहे. या मोहिमेत बालसुधार शाळेच्या मुख्याध्यापिका इंदुमती थोरात, मुख्याध्यापिका छाया बनसोडे, दादासाहेब शेडगे, प्रदीप रवलेकर, कोमल पवार, वनिता पंडित तसेच विद्यार्थी-विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)