मराठा आरक्षणाला समर्थन करणाऱ्या याचिकाकर्त्यांचा दावा

अन्य आयोगांच्या तुलनेत गायकवाड अहवाल परिपूर्ण

मुंबई – मराठा आरक्षणासंदर्भात आतापर्यंत स्थापन केलेल्या आयोगांच्या तुलनेत गायकवाड
कमिटीने तयार केलेला अहवाल हा परिपूर्ण आहे, असा दावा मराठा समाजाला आरक्षणाचे समर्थन करणाऱ्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने ऍड. विनीत नाईक यांनी आज उच्च न्यायालयात केला. या आयोगाने केलेल्या शिफारशी मान्य करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी विनंतीही ऍड. नाईक यांनी न्यायालयाला केली.
मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्यसरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या आणि आरक्षणाला समर्थन देणाऱ्या याचिकांवर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यावेळी राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाच्या समर्थनार्थ अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने ऍड. विनीत नाईक यांनी आरक्षणासंदर्भात यापूर्वी स्थापन केलेल्या आयोगाच्या अहवालातील त्रुटींवर बोट ठेवले. आता पर्यंत स्थापन केलेल्या आयोगांनी आरक्षणाच्या दृष्टीकोनातून कोणताही सर्व्हे अगर माहिती जमा न करता अहवाल दिला.

सुरुवातीला मंडल आयोगाने स्वतंत्र सर्व्हे केला नाही.1931 मध्ये इंग्रजांच्या काळात करण्यात आलेल्या सर्व्हेच्या आधारे मराठा समाजाला प्रगत समाज म्हणून नाकारण्यात आले. तर राष्टीय मागास आयोगाकडे कोणताही सर्व्हे न करता मंडल आयोगाची केवळ री ओढीत अहवालात मराठा समाज प्रगत असल्याची नोंद केली.

त्यानंतर 2001 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या खत्री आयोगाने मराठा कुणबी आणि कुणबी मराठा एकच असून केवळ कुणबी समाजाला ओबीसी असल्याचा अहवाल दिला. तर 2008 मध्ये बापट आयोगाच्या सदस्यांनी केलेल्या सर्व्हेक्षणानुसार मराठा समाज मागास असल्याचे मान्य करताना त्यांना ओबीसी ऐवजी एसईबीसी गटात आरक्षण देण्यात यावे, असे मत व्यक्‍त केले होते, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. तर गायकवाड कमिटीने यापर्वूी स्थापन करण्यात आलेल्या आयोगाच्या त्रुटींचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी मान्यवर संस्थांनी तयार केलेल्या सर्व्हेक्षणाचा आधार घेत मराठा समाजात हा सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असल्याने मराठा समाजासाठी स्वतंत्र गट तयार करून अहवाल तयार केला आणि त्यांना आरक्षण देण्याची शिफारस केली. आज ही सुनावणी अपूर्ण राहिल्याने उद्या बुधवारी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)